dmk mla suspended from party after he met bjp president j p nadda | Sarkarnama

भाजपचे अध्यक्ष नड्डा यांना आमदार भेटला अन् झाला निलंबित!

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

भाजपच्या अध्यक्षांना दिल्लीला भेटायला जाणे तमिळनाडूतील एका आमदाराला चांगलेच महागात पडले आहे. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

चेन्नई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना दिल्लीला भेटायला जाणे तमिळनाडूतील आमदाराला चांगलेच महागात पडले आहे. या आमदाराचे नाव कू का सेल्वम असे आहे. ते द्रमुक पक्षाचे आमदार असून, पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित केले आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना भेटण्यासाठी आमदार सेल्वम हे दिल्लीला गेले होते. त्यांच्यासमवेत त्यांची जुने सहकारी व्ही.पी. दुराईस्वामी हे होते. दुराईस्वामी यांनी नुकतात द्रमुक पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तमिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन हेही या वेळी उपस्थित होते. सेल्वम हे द्रमुक सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. 

द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांचे निकटवर्ती एन.चिरतारसू यांच्यावर चेन्नई पश्चिम विभागाची जबाबादारी देण्यात आली आहे. चिरतारसू या तरुण नेत्यावर जबाबदारी सोपविल्याने सेल्वम नाराज आहेत. कोरोनामुळे आमदार जे.अनबळगन यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. अखेर पक्ष नेतृत्व नाराजी दूर करीत नसल्याने सेल्वम यांची भाजपमध्ये जाण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू होती, असे सूत्रांनी सांगितले. 

सेल्वम यांनी अखेर भाजपचे अध्यक्ष नड्डा यांना भेटायला जाऊन पक्षाच्या विरोधात बंड केले. मात्र, त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी वेगळेच कारण दिले होते. सेल्वम यांचा मतदारसंघ थाउजंड लाईट हा आहे. या मतदारसंघातील नंगम्बक्कम रेल्वे स्थानकावर दोन इलेव्हेटर बसविण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना भेटण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, नड्डा यांची भेट घेतल्यानंतर सेल्वम यांना मात्र, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण केले. 

अखेर द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन यांची दखल घेतली. त्यांनी आमदार सेल्वम यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाच्या नियमांचे उल्लंघन करुन पक्षाला बदनाम केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या सर्वच पदांवरुन त्यांना निलंबित करण्यात आले असून, हे निलंबन तात्पुरत्या स्वरुपाचे असेल, असे सूत्रांनी नमूद केले.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख