शेतकरी नेत्यांविरूध्द लुकआऊट नोटीस; मेधा पाटकरांविरोधातही गुन्हा - Delhi Police issued Look Out Notice against farmers Leaders | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी नेत्यांविरूध्द लुकआऊट नोटीस; मेधा पाटकरांविरोधातही गुन्हा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अराजकता पसरविण्याच्या गुन्ह्याखाली कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून सर्वश्री मेधा पाटकर, दर्शन पाल, योगेंद्र यादव, राजिंदरसिंग, बूटा सिंग व बलबीर सिंह राजेवाल आदी ३७ शेतकरी नेत्यांविरूध्द समयपूर बादली पोलिस टाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

नवी दिल्ली :  प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक स्मारक लाल किल्ल्याच्या परिसरात घुसून स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावला जातो तेथे धार्मिक झेंडा लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन जणांवरिूध्द राष्ट्रद्रोहाचा (कलम १२४ अ) खटला दाखल केला आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अराजकता पसरविण्याच्या गुन्ह्याखाली कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून सर्वश्री मेधा पाटकर, दर्शन पाल, योगेंद्र यादव, राजिंदरसिंग, बूटा सिंग व बलबीर सिंह राजेवाल आदी ३७ शेतकरी नेत्यांविरूध्द समयपूर बादली पोलिस टाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

यातील काहींविरूध्द तर भारताबाहेर जाण्याची परवानगी नाकारून लुकआऊट नोटीसही (एलओसी) जारी करण्यात आली असून त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शेतकरी नेत्यांबरोबर चर्चेस सरकारने पुन्हा तयारी दाखविली तरी नोटीशी दिलेल्या नेत्यांना चर्चेत सहभागी करून घेण्यास सरकारची तयारी नसल्याचे आज सांगण्यात आले. योगेंद्र यादव यांना चर्चेच्या परिसरात येण्यास सरकारने पहिल्यापासून विरोध केला होता व ४१ आंदोलनकर्त्या संघटनांच्या शेतकरी नेत्यांनी तो मान्य करून यादव यांना एकाही चर्चेत प्रत्यक्ष सहभागी करून घेतलेले नव्हते.

दरम्यान लाल किल्ला ही एतिहासिक व प्राचीन स्मारकांच्या यादीतील वास्तू असल्याने येत्या ३१ जानेवारीपर्यंत तो पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पुरातत्व विभागाने म्हटले आहे. लाल किल्ला व दिल्लीच्या विविध भागांतील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. टिकैत यांच्या गाझीपूर सीमेवरील आंदोलस्थळावरील तंबूच्या बाहेर पोलिसांनी नोटीस चिटकावली. त्यांनी नोटीशीला उत्तर देण्यासाठी ३ दिवसांचा वेळ मागितला आहे. 

२६ जानेवारीच्या हिंसाचार प्रकरणी आतापावेतो १९ लोकांना अटक करण्यात आली असून २५ हून जास्त गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत. हिंसाचारात ३९४ पोलिस जखमी झाल्याचे दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. यात लाल किल्ल्यावर पोलिसांच्या अंगावर धावून येणाऱ्या सशस्त्र जमावापासून वाचण्यासाठी २०-२० फुटांवरून उड्या मारलेल्या पोलिस व निमलष्करी जवानांचा समावेश आहे.

कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी ट्रॅक्‍टर रॅलीला परवानगी देताना शेतकरी नेत्यांनी दिलेले लेखी आश्‍वासन पाळले नाही व त्यामुळे दिल्लीत हिंसाचार उफाळला व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असा आरोप शेतकरी नेत्यांवर ठेवण्यात आला आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख