दिल्ली हिंसाचार प्रकरणात अभिनेता दीप सिद्धूला अटक - Delhi Police Arrested Punjabi Actor Deep Siddhu | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्ली हिंसाचार प्रकरणात अभिनेता दीप सिद्धूला अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक केली आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक केली आहे. हा हिंसाचार झाल्यापासून दीप सिद्धू फरारी होता. त्याच्यावर एक लाख रुपयांचे इनाम लावण्यात आले होते. 

हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धू फरारी असताना वेगवेगळ्या ठिकाणांहून फेसबूक लाईव्ह करत होता. आपल्याला कोणी शोधू नये म्हणून या फेसबूक लाईव्हसाठी दीप सिद्धू ब्रिटनमधील एका महिलेची मदत घेत होता, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. दिल्ली पोलिस आज पत्रकार परिषद घेणार असून त्यात दीप सिद्धू विरोधातल्या आरोपांची माहिती दिली जाणार आहे. त्याला कोठून अटक केली, याची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही. 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅलीदरम्यान झालेल्या प्रकरणात पोलिसांनी बावीस गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीत काही भागात शेतकरी आंदोलनाला त्या दिवशी हिंसक वळण लागले. पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. पण शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकला. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. 

या आंदोलना दरम्यान काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन लाल किल्ला परिसरात पोहचले होते. लाल किल्ल्यावर चढून त्यांनी तिरंग्या व्यतिरिक्त अन्य ध्वज फडकावला. जे शेतकरी लाल किल्ल्यावर गेले त्यांच्यात दीप सिद्धूचाही समावेश होता. शेतकऱ्यांना वास्तविक लाल किल्ल्यावर जायचे नव्हते. मात्र, दीप सिद्धूनेच त्यांना भडकावले, असा त्याच्यावर आरोप आहे. तो व त्याचे साथीदार जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुजरात सिंग यांच्यावर एक लाख रुपयांचे, तर जजबीर सिंग, बुटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांच्यावर प्रत्येकी ५० हजार रुपयांचे ईनाम दिल्ली पोलिसांनी लावले होते.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख