दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीची ३४ हजारांची फसवणूक - Delhi CM's Daughter duped on Online Selling Platform | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीची ३४ हजारांची फसवणूक

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल हिची एका वेबपोर्टलच्या माध्यमातून तब्बल ३४ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल हिची एका वेबपोर्टलच्या माध्यमातून तब्बल ३४ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एक सोफा आॅनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विकण्याच्या प्रयत्नात ही फसवणूक करण्यात आली आहे. 

हर्षिता हिने आॅनलाईन पोर्टलवर एक जुना सोफा विकण्यासाठी जाहिरात दिली होती. एका व्यक्तीने तिच्याशी संपर्स साधला. सोफ्याची किंमत ठरुन व्यवहार पक्का करण्यात आला. बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी या व्यक्तीने सुरुवातीला हर्षिताच्या खात्यावर काही रक्कम पाठवली. त्यानंतर या व्यक्तीने हर्षिताला एक क्यू आर कोड पाठवला आणि तो स्कॅन करुन उर्वरित रक्कम काढून घेण्यास सांगितले. हा कोड स्कॅन केल्यानंतर हर्षिताच्या खात्यावरील वीस हजार रुपयांची रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यावर वळवली गेली.

हर्षिताने याबाबत विचारणा केली असता आपण चुकीचा कोड पाठवला असल्याचे सांगत या व्यक्तीने दुसरा कोड पाठवला. तो स्कॅन केला असता हर्षिताच्या खात्यावरुन पुन्हा १४ हजार रुपये वर्ग झाले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे हर्षिताच्या लक्षात आले. त्यानंतर तिने दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तपास सुरु केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख