corona community transmission started in india said experts | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

काळजी घ्या...देशात कोरोनाचे सामूहिक संक्रमण सुरू

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जून 2020

देशात कोरोनाच्या संसर्गाचा पुढील टप्पा म्हणजेच सामूहिक संक्रमण सुरू झाल्याचा केंद्र सरकार वारंवार इन्कार करीत आहे. मात्र, तज्ज्ञांनी हा टप्पा सुरू झाल्याचे म्हटले आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे सामूहिक संक्रमण सुरू झाले आहे, असे देशातील काही आघाडीच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. या टप्प्यात कोरोनाचा अतियश वेगाने फैलाव होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारकडून कोरोनाच्या सामूहिक संक्रमणाचा वारंवार इन्कार केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी सरकारचे कान टोचले आहेत. 

कोरोना महामारीमध्ये सामूहिक संक्रमण ही सर्वात भीषण अवस्था असते. अमेरिकेसह बहुतांश युरोपीय देशांनी ती अनुभवली आहे. केंद्र सरकार असे संक्रमण सुरू झाल्याचा सातत्याने इन्कार करीत आले आहे. मात्र आता तज्ञांनी दिलेल्या अहवालातच ही वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, देशात लॉकडाउन योग्यवेळी लागू करण्यात आले. त्यामुळे सरकारला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला. मात्र आता या टप्प्यावर कोरोना महामारी समूळ नष्ट होईल अशी आशा करणे चुकीचे आहे.

तज्ज्ञांनी म्हटले आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये सरकारने आम्हाला विश्वासात घेतले नाही. याचबरोबर या निर्णयप्रक्रियेत आम्हाला समाविष्ट करून घेण्यात आले नाही. त्यामुळे महामारीचा संसर्ग आणि मानवी संकट या दोन्हींची मोठी किंमत भारत सध्या मोजत आहे. 

हे देखील वाचा : केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; दिल्लीच्या सीमा बंद करणार 

इंडियन पब्लिक हेल्थ एसोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव अँड सोशल मेडिसिन व इंडियन एसोसिएशन ऑफ एपिडेमियोलॉजिस्टच्या काही तज्ज्ञांनी सामूहिक संक्रमणाचा निष्कर्ष मांडणारा हा अहवाल तयार केला असून, तो पंतप्रधानांना पाठविण्यात आला आहे. 

देशातील रुग्णसंख्या दोन लाखांकडे 

देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ९० हजार ५३५ झाली असून, बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या ५ हजार ३९४ वर पोचली आहे. जगात कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत भारत आता जगातील सातवा देश ठरला आहे. अर्थात सरकार सांगते ते रुग्णसंख्येचे अधिकृत आकडे असले तरी त्याच्याही पलीकडे लक्षण न दिसणारे अनेक रुग्ण असू शकतात, अशी कबुली नीती आयोगाने नुकतीच दिली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख