congress targets chief minister yogi adityanath over bjp leaders links with vikas dubey | Sarkarnama

...ही ठरेल योगी सरकारसाठी उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी !

वृत्तसंस्था
सोमवार, 6 जुलै 2020

कानपूरमधील चकमकीनंतर उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. यावरुन काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारला लक्ष्य करणे सुरुच ठेवले आहे. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढला असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कानपूरमधील चकमकीत आठ पोलीस मारले गेल्यानंतर तर राज्य सरकारची मोठी नामुष्की झाली आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुन  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील हल्ला काँग्रेसने सुरुच ठेवला आहे. राज्यात आठ पोलीस हुतात्मा होणे ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारसाठी शेवटची काडी ठरेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी आज म्हटले आहे.  

अजय कुमार लल्लू म्हणाले की, भाजप सरकारचा राज्यातील गुंडांना वरदहस्त आहे. विकास दुबे याच्याशी भाजप नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. यात काही भाजप आमदारांचाही समावेश आहे. याची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. राज्यात भाजप नेते गुंडांना वाचवत असल्याचे काँग्रेसने याआधीच म्हटले होते. आता हे सिद्ध झाले आहे. विकास दुबेसारखा गुंड आठ पोलिसांना ठार करतो, अशा बाबी सरकारने चालवून घेऊ नयेत. राज्यात आठ पोलीस हुतात्मा होणे ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारसाठी शेवटची काडी ठरेल. 

विकास दुबेसारखा गुन्हेगार सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा आशीर्वादाने राज्यात कारवाया करीत होता. हे नेते कोण आहेत, हे राज्यातील जनतेला जाणून घेण्याचा अधिकार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असून, त्यांनी राज्यात जंगलराज आणले आहे. सामान्य नागरिक आता त्यांच्या सुरक्षेबद्दल घाबरू लागले आहेत. राज्यातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेस या सरकारशी लढेल, असे लल्लू म्हणाले. 

गँगस्टर विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना 2 जुलैला रात्री घडली होती. यात आठ पोलीस ठार झाले होते. यामुळे विकास दुबे हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांचे सरकार उत्तर प्रदेशात असताना एका मंत्र्यांची हत्या केल्याचाही आरोप दुबे याच्यावर आहे. उत्तर प्रदेशात त्याच्यावर तब्बल 60 गुन्हे दाखल आहेत. 

विकास दुबे याने 2001 मध्ये पोलीस ठाण्यात घुसून राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. या हत्येमुळे तो उत्तर प्रदेशसह राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला होता. त्याने 2000 मध्ये कानपूरमधील ताराचंद इंटर कॉलेजच्या सहाय्यक व्यवस्थापकाचा खून केला होता. त्याचवर्षी कानपूर कारागृहात असतानाच त्याने रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट आखला होता. नंतर 2004 मध्ये केबल व्यावसायिक दिनेश दुबे खून प्रकरणातही त्याचा समावेश होता. दुबेने 2018 मध्ये त्याच्या चुलतभावावरच खुनी हल्ला करवून आणला होता. 

विकास दुबेने 2002 मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावल्या होत्या. त्यामुळे कानपूर शहरासह बिलहार, शिवराजपूर, रिनयान आणि चौबेपूर या भागात त्याची दहशत आहे. काल झालेली चकमक ही चौबेपूर भागातच झाली होती. येथेच दुबे आणि त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांना ठार केले. दुबे याचे अनेक राजकीय पक्षांशी जवळचे संबंध आहेत. शिवराजपूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत कारागृहातून निवडून येण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंद आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख