संसदीय समितीची बैठकच नाही तर, राहुल गांधी अनुपस्थित कसे?

भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमधील शाब्दिक युद्ध सुरूच आहे. संरक्षणविषयक संसदीय समितीच्या बैठकीवरुन आज दोन्ही पक्षांमध्ये जुंपली.
congress target bjp president j p nadda over parliamentary standing committee on defence
congress target bjp president j p nadda over parliamentary standing committee on defence

नवी दिल्ली : संरक्षणविषयक संसदीय समितीचे सदस्य असूनही या समितीच्या एकाही बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी हजर राहिलेले नाहीत, असा आरोप भाजपचे अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी आज केला होता. याला काँग्रेसने आता प्रत्युत्तर दिले आहे. मागील तीन महिन्यांत संरक्षणविषयक संसदीय समितीची बैठकच झाली नाही तर राहुल गांधी अनुपस्थित कसे, असा सवाल काँग्रेसने केला आहे. 

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, भाजपने स्टंटबाजी आणि मथळ्यांचे व्यवस्थापन करणे सोडून द्यावे आणि गंभीर विषयांकडे लक्ष द्यावे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. काँग्रेसवर आरोप करण्याऐवजी त्यांनी एवढी ताकद चीनशी लढताना खर्ची घातली असती तर चीनने घुसखोरी केली नसती. याचबरोबर चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावर संपूर्ण देशातील जनतेशी खोटे बोलण्याची वेळही आली नसती. किमान भाजपच्या अध्यक्षांनी तरी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांप्रमाणे बोलू नये. 

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, सरकारने संरक्षणविषयक संसदीय समितीची बैठकच मागील तीन महिन्यांत बोलाविलेली नाही. लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण असतानाही सरकारने बैठक घेतलेली नाही. भाजप सरकारची परराष्ट्रनीती पूर्णपणे फसलेली आहे. यामुळे अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या आरोपांचा आधार सरकारला घ्यावा लागत आहे. चीन भारतात घुसखोरी करीत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला क्लिनचिट देत आहेत.  

चीन विवाद सुरू झाल्यापासून राहूल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने ट्‌विटद्वारे टीका करत आहेत. मोदी यांनी आतापावेतो गांधी यांना थेट प्रत्युत्तर देणे टाळले आहे. मात्र, नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा निवडक मंत्र्यांसह सरकारची बाजू लढवत आहेत. राहूल यांच्याच विधानांना आधार बनवून भाजप त्यांच्यावर पलटवार करत आहे. 

नड्डा यांनी आज चीन मुद्यावरून गांधी घराण्याचा पुन्हा उध्दार केला. ते म्हणाले की, संसदीय समित्याच्या बैठकांना हजर राहणाऱ्या सदस्यांना दरवाजाशी ठेवलेल्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करावी लागते. त्यानंतर त्यांची उपस्थिती ग्राह्य धरली जाते. या समित्या मिनी पार्लमेंट मानल्या जात असल्याने त्यांच्या बैठकांना खासदारांनी हजर राहिलेच पाहिजे. यासाठी राज्यसभा सभापती वेंकय्य नायडू विशेष आग्रही असतात. या बैठकांना हजर न राहिलेल्यांची नावे सरळ वृत्तपत्रात छापा, असे त्यांनी मागील अधिवेशनात जाहीरपणे सांगितले होते. 

राहुल गांधी अशा गौरवशाली वंशपरंपरेतील आहेत ज्यांच्यासाठी संरक्षण संसदीय समित्या नव्हे तर कमिशन महत्वाचे ठरत असते. राहुल गांधींनीही या समितीच्या एकाही बैठकीत येण्याची तसदी घेतलेली नाही. आणि तेच आता आमच्या सैन्यदलांचे मनोधैर्य कच्ची करणारी टीका सतत करत आहेत. सशस्त्र दलांच्या शौर्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत हे दुःखद आहे. देशावरील संकटाच्या काळात एका जबाबदार विरोधी पक्षीय नेत्याने जे करू नये तेच राहुल गांधी करत आहेत. कॉंग्रेसमध्ये संसदीय कामकाजाचे सखोल ज्ञान व माहिती असणारे अनेक योग्य सदस्य आहेत. पण एक राजवंश त्यांची वाट अडवून त्यांना पुढे येऊ देत नाही हे खेदकारक आहे, असे नड्डा म्हणाले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com