राजकीय बोलणार नाही, असे म्हणून सुरजेवाला पुन्हा मूळपदावर..! - congress spokesperson randeep surjewala targets bjp on religion issue | Politics Marathi News - Sarkarnama

राजकीय बोलणार नाही, असे म्हणून सुरजेवाला पुन्हा मूळपदावर..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

राम मंदिराचे उद्या अयोध्येत भूमिपूजन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाची जोरदार लगबग अयोध्येत सुरू झाली आहे. या कार्यक्रमावरुन राजकीय वादंगही सुरू आहे. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  उद्या (ता.५) होत आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत जोरदार लगबग सुरू झाली आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भूमिपूजनाआधी राजकीय टीकाटिप्पणी करणार नाही अशी भूमिका घेतली मात्र, भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल.  

मागील वर्षी 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील जागा राम मंदिराच्या उभारणीसाठी द्यावी, असा आदेश केंद्र सरकारला दिला होता. त्यानंतर या वर्षी 5 फेब्रुवारीला अयोध्येत मंदिराचे बांधकाम करण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आल्याची घोषणा 5 फेब्रुवारीला करण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर हे ट्रस्ट देखरेख ठेवणार आहे. 

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरजेवाला यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही राजकीय टीकाटिप्पणी अशी जाहीर भूमिका मांडली. मात्र, यानंतर त्यांना भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचा मोह आवरता आला नाही. ते म्हणाले की, राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या एक दिवस आधी मला कोणतीही राजकीय टिप्पणी करायवयाची नाही. परंतु, मला सांगावेसे वाटते की, राजकारणात धर्म असावा पण धर्माचे राजकारण करु नये. उद्या संपूर्ण देश भगवान रामाच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा साक्षीदार बनणार आहे. 

काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर निवेदन जाहीर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जग आणि भारतीय उपखंडात रामायणाचे अतिशय महत्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये भगवान राम आणि सीता हे मार्गदर्शक आहेत. रामायण आपल्याला धर्म, निती, कर्तव्य, उदारता आणि सेवा शिकवते. अनेक शतके रामायण आपल्या देशाला एकत्र ठेवत आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख