कोरोनाबाबत सूचना केल्यास केंद्रातील मंत्री विरोधकांची खिल्ली उडवतात  - Congress President Sonia Gandhi criticizes Modi government over Corona's measures | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाबाबत सूचना केल्यास केंद्रातील मंत्री विरोधकांची खिल्ली उडवतात 

वृत्तसंस्था
शनिवार, 17 एप्रिल 2021

कोरोना लसीकरणाची वयोमर्यादा 25 वर्षांपर्यंत कमी करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

नवी दिल्ली  ः कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे बिघडलेली देशभरातील परिस्थिती याचा आढावा घेण्यासाठी आज कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोना स्थिती आणि त्यावर उपाय योजना करण्यात आलेले अपयश याबद्दल मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर केंद्र सरकारला आज एक वर्षाचा पूर्ण वेळ मिळाला. परंतु सरकारने वैद्यकीय सुविधा निश्चित करण्याऐवजी केवळ राजकारण केले, असा आरोपही त्यांनी या वेळी मोदी सरकारवर केला. 

दरम्यान, कोरोनावरील उपाय योजनासंदर्भात सूचना केल्यास केंद्र सरकारचे मंत्री विरोधकांची खिल्ली उडवतात, असा गंभीर आरोपही त्यांनी या वेळी केला.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. कोरोना लसीकरणाची वयोमर्यादा 25 वर्षांपर्यंत कमी करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. त्यात दमा, मधुमेह आणि इतर काही आजारांनी पीडित तरुणांना प्राधान्याने लस देण्याची विनंती त्यांनी सरकारला केली आहे. 

कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरणे आणि त्यावरील औषधे जीएसटीपासून मुक्त करावीत. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाय योजना करण्यासाठी गरीबांना दरमहा सहा हजार रुपयांची मदत दिली जावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीतून केली आहे.

गैरभाजपशासित राज्यांसोबत मदतीबाबत भेदभाव  

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘कॉंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे सहयोगी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची मागणी करण्यासाठी पत्र लिहिले आहे. परंतु केंद्र सरकार त्याबाबत मौन पाळत आहे, बऱ्याच राज्यांना पुरेसे  लस दिलेली नाही. तसेच व्हेंटिलेटरही दिलेली नाहीत.

राहुल गांधींचे सूचक ट्विट

दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘शमशान और कब्रिस्तान दोनों… जो कहा सो किया’, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. त्याचबरोबर मोदी मेड डिसास्टर हा ‘हॅशटॅग’ही वापरला आहे.  कोरोनामुळे मृत्यूदरही वाढत चालल्याचं दिसत आहे. स्मशानात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ट्विटरवरून हा निशाणा साधला आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख