congress party demands cbi probe in kerala gold smuggling case | Sarkarnama

सोने तस्करी प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या सचिवांकडे संशयाची सुई

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जुलै 2020

केरळमध्ये मोठे सोने तस्करी पकडली सापडली असून, यावरुन राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसने याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केला आहे. 

तिरुअनंतपुरम : राज्यातील सोने तस्करी प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केरळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुल्लपल्ली रामचंद्रन यांनी केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांची सहभागाचीही चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एम.शिवशंकर यांच्याकडून दोन्ही पदभार काढून घेण्यात आल्याने त्यांच्याकडे संशयाची सुई वळली आहे. 

तिरुअनंतपुरम विमानतळावर तब्बल 30 किलोची सोने तस्करी रविवारी पकडण्यात आली होती. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानामधून ही तस्करी करण्यात आली होती. सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सरीत कुमार याला तस्करी प्रकरणी अटक केली आहे. तो आधी संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्य दूतावासात जनसंपर्क अधिकारी  होता. या प्रकरणातील दुसरी आरोपी स्वप्ना सुरेश ही फरार आहे.

केरळच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या स्पेस पार्क अँड स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (केएसटीआयएल) या कंपनीची स्वप्ना सुरेश ही कर्मचारी आहे. सोने तस्करीत तिचा सहभाग आढळल्यानंतर तिची हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा कार्यभार मुख्यमंत्री विजयन यांच्याकडे आहे. याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एम.शिवशंकर यांच्याकडून दोन्ही पदभार काढून घेण्यात आले आहेत.  

या मुद्द्यावर काँग्रेसने राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लपल्ली रामचंद्रन म्हणाले की, सोने तस्करी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा. या प्रकरणातील मुख्यमंत्री विजयन यांच्या सहभागाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. ही अतिशय मोठी घटना आहे. सोने तस्करीत थेट मुख्यमंत्री कार्यालयाचा सहभाग असण्याची ही पहिलीच घटना आहे. यात एक महिला दोषी आढळली आहे. ती सोने तस्करी करीत असल्याच्या पुरावे समोर आलेले आहेत. या महिलेची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडेच असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागात करण्यात आली होती. तिची नियुक्ती का करण्यात आली हेच मला समजत नाही. 

केरळच्या गुन्हे विभागाने संबधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी ते करीत आहेत. अशा प्रकारच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची गरजच काय होती? याची प्रथम चौकशी व्हायला हवी, असे रामचंद्रन यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख