कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे खासगी विधेयकास्त्र - Congress MP's submitted Private Bills against Farm Laws | Politics Marathi News - Sarkarnama

कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे खासगी विधेयकास्त्र

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

पंजाबमधील माजी मंत्री परिणित कौर, माजी मंत्री मनीष तिवारी यांच्यासह संतोखसिंह चौधरी, गुरजितसिंग औजला, जसबिरसिंग गिल, सादिक मोहम्मद, रवनितसिंग बिट्टू, डाॅ. अमरसिंग या आठ काँग्रेस खासदारांनी कृषी कायद्यांची संवेदनशीलता आणि शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता लोकसभाध्यक्षांनी विधेयक प्राधान्यक्रमाने चर्चेला घ्यावे, अशी मागणी केली.

नवी दिल्ली :  केंद्राचे वादग्रस्त कृषी कायदे हटविण्यासाठी काॅंग्रेसच्या पंजाबमधील खासदारांनी लोकसभेमध्ये स्वतंत्र खासगी विधेयके मांडली आहेत. बेकायदेशीर आणि घटनाबाह्य कृषी कायदे रद्द करावीत, अशी मागणी करणारी खासगी विधेयके काँग्रेस खासदारांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केली.

पंजाबमधील माजी मंत्री परिणित कौर, माजी मंत्री मनीष तिवारी यांच्यासह संतोखसिंह चौधरी, गुरजितसिंग औजला, जसबिरसिंग गिल, सादिक मोहम्मद, रवनितसिंग बिट्टू, डाॅ. अमरसिंग या आठ काँग्रेस खासदारांनी कृषी कायद्यांची संवेदनशीलता आणि शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता लोकसभाध्यक्षांनी विधेयक प्राधान्यक्रमाने चर्चेला घ्यावे, अशी मागणी केली.

स्वतःला शेतकरी म्हणविणाऱ्या सर्व खासदारांनी पक्षभेद बाजूला कृषी कायदे हटविण्यासाठी मांडलेल्या खासगी विधेयकांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन मनीष तिवारी यांनी केले. मात्र काँग्रेसचे अन्य राज्यांमधील खासदारही अशाच प्रकारे खासगी विधेयक मांडणार काय, यावर तिवारी यांनी सर्वपक्षीय समर्थनाचे आवाहन करून वेळ मारून नेली. कृषी कायद्यांविरोधात अडीच महिन्यांपासून जनआंदोलन सुरू असून १०० जणांनी प्राण गमावले आहे. तर १२० जणांना अटक झाली आहे. हे कायदे रेटण्यातून सरकारचा अज्ञानी आणि अहंकारी चेहरा उघड झाल्याचा टोला तिवारी यांनी लगावला.

मागील ७० वर्षात १४ खासगी विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. त्यामुळे लोकसभा असो की राज्यसभा असो शेतकऱ्यांबद्दल चिंता असणाऱ्या खासदारांनी या खासगी विधेयकांना पाठिंबा द्यावा, अशी साद मनीष तिवारी यांनी घातली. तर, माजी मंत्री परिणित कौर यांनी केंद्र सरकारची निती आणि नियत यावर संशय असल्याचे टिकास्त्र सोडले. तसेच, ज्या खासदारांनी आपला व्यवसाय शेती असल्याचे म्हटले आहे त्यांनी धरणीमातेशी दगा करू नये, असा चिमटाही त्यांनी काढला.
Edited by - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख