स्थलांतरितांच्या प्रश्नी काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे देशभरात अनेक स्थलांतरित कामगार अडकून पडले आहे. त्यांचे हाल सुरू असून, त्यांच्या या दयनीय अवस्थेकडे केंद्र सरकार पाहत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसन केली आहे.
Congress moved to the Supreme Court on the matter migrants
Congress moved to the Supreme Court on the matter migrants

नवी दिल्ली : लॉकडाउनमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. सरकार याबाबत पावले उचलत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करावी, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी बुधवारी दाखल केली. 

सुरजेवाला यांनी याचिकेत म्हटले आहे की, स्थलांतरित कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावेत. विशेषतः लॉकडाउनमुळे मूळ राज्यात परत जाऊ न शकणाऱ्या कामगारांसाठी सरकारला पावले उचलण्यास सांगावे. स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नी विरोधी पक्षांचा समावेश असलेली संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे सरकार विरोधी पक्षांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते. 

सुरजेवाला यांनी ही याचिका सुनील फर्नांडिस यांच्यामार्फत दाखल केली आहे. सरकारने तातडीने जिल्हा आणि गाव पातळीवर कामगारांना स्वीकारण्यासाठी सुविधा केंद्रे सुरू करावीत आणि मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यास मदत करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. 

न्यायालयाकडूनही याआधीही दखल 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मंगळवारी (ता.26) स्थलांतरितांच्या प्रश्नाची स्वतःहून दखल घेतली होती. देशभरात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना संबंधित राज्य सरकारांनी अन्न आणि निवारा द्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. याचबरोबर न्यायालयाने या प्रकरणी केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 28 मेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. 

राहुल गांधी म्हणाले, मोदीजी तुमचे लॉकडाउन पूर्णपणे फसले
नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चार टप्प्यातील राष्ट्रीय लॉकडाउनचे पाऊल सपशेल अपयशी ठरले असून, त्यातून हाती काही लागलेले नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देश पुन्हा खुला करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या धोरणाबाबत जनतेला स्पष्टीकरण हवे आहे. सरकार स्थलांतरितांना आणि राज्य सरकारांना कशा प्रकारे मदत करणार आहे, हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. देशात कोरोनाविषाणूचा प्रसार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना सरकारने पुढील दिशा काय ठरविली आहे, याबद्दल जनता प्रश्न विचारत आहे. केंद्राच्या मदतीशिवाय राज्यांनी पुन्हा उभारी घेणे शक्य नाही. सरकारने जनता आणि उद्योगांना आर्थिक मदत न केल्यास फार गंभीर परिस्थिती निर्माण होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com