congress mla resigns from congress and joins bjp in madhya pradesh | Sarkarnama

राजस्थानमध्ये बंडाळी सुरू असताना मध्य प्रदेशात काँग्रेसला गळती

सरकारनामा ब्युरो
रविवार, 12 जुलै 2020

राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष शिगेला पोचला असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता मध्य प्रदेशातही काँग्रेसला गळती लागली आहे. 

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. यातून काँग्रेस पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजस्थान काँग्रेसमधील राजकीय वादळ शमण्याची चिन्हे दिसत नसतानाच आता मध्य प्रदेशातही काँग्रेसला गळती लागली आहे.   

उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हे काही आमदारांसह दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप केला आहे की, भाजप त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी राज्यातील भाजपचे नेतृत्व केंद्राच्या इशारानुसार आमदार खरेदीच्या घोडेबाजार करीत आहेत. त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना दहा कोटी रूपयांची ऑफर भाजप देत आहे.

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार प्रद्युम्नसिंह लोधी यांनी आज काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, पक्ष सदस्यत्वही सोडले आहे. लोधी हे छत्रपूर जिल्ह्यातील बडा मल्हेरा मतदारसंघाचे आमदार होते. आज त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही.डी.शर्मा यांनी लोधी यांचे पक्षात स्वागत केले. 

लोधी यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन चौहान यांची भेट घेतली होती. याचबरोबर भाजप नेत्या उमा भारती यांचीही त्यांनी भेट घेतली होती. लोधी हे प्रतिनिधित्व करीत होते त्या बडा मल्हेरा मतदारसंघातून उमा भारती 2003 मध्ये निवडून आल्या होत्या. लोधी यांच्या राजीनाम्याने राज्यातील काँग्रेसचे संख्याबळ आता 91 वर आले आहे. या वर्षी मार्च महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून बाहेर पडले होते. यामुळे राज्यातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. यानंतर भाजपचे सरकार स्थापन होऊन शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. 

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना लोधी म्हणाले की, मी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माझा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. बडा मल्हेरा मतदारसंघ आणि बुंदेलखंडाचा विकास केवळ भाजप करू शकतो.  माझ्या भागातील विकासकामांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख