नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. आधी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि आता राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विरुद्ध तरुण फळी हा वाद पुन्हा समोर आला आहे. यावरुन पक्षातच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर पक्षाच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरुन ज्येष्ठ नेत्यांनी उघड भूमिका घेऊन पक्षाला सुनावले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील वादामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. पक्षातील तरुण नेते पक्ष सोडून जात असल्याने पक्षात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या राज्यसभा खासदारांची काल बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ आणि तरुण या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा झाली. बैठकीत दोन गट पडले आणि काही वेळ त्यांच्यात जुंपली.
या बैठकीत काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, काँग्रेस जनतेपासून दुरावत चालल्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यासारख्या नेत्यांना योग्य स्थान देण्यात पक्ष चुकला, असे परखड मतही काहींनी व्यक्त केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवरुन ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजित रंजन यांनी यावरुन पक्ष नेतृत्वाला थेट प्रश्न केला आहे. काँग्रेसला कठोर नेतृत्वाची गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, जनभावनेला हात घालणारे आणि पक्षाला पूर्णपणे बदलू शकतील असे नेते हवे आहेत. काँग्रेसच्या काल झालेल्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मला तेथे काय झाले हेही माहिती नाही. परंतु, हा मुद्दा ज्येष्ठ विरुद्ध तरुण नाही. आम्हाला कठोर नेतृत्वाची गरज आहे. नेता जो म्हणेल ते पक्ष कार्यकर्त्यांना ऐकावेच लागेल. यासाठीच कठोर नेतृत्वाची पक्षाला आवश्यकता आहे. पक्ष आणि संघटनात्मक पातळीवर पूर्णपणे बदल घडवणारा कठोर नेता पक्षासाठी गरजेचा आहे. आपल्याकडे जनभावनेला हात घालणारे नेतेच नाहीत.
सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड पुकारल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका अखेर मागे घेतली होती. त्यानंतर ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.
Edited by Sanjay Jadhav

