मनमोहनसिंग यांच्या बचावासाठी शशि थरूर उतरले मैदानात

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ विरुद्ध तरुण हा वाद उफाळून आला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आहेत. आता त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक जण मैदानात उतरू लागले आहेत.
congress leaders shahi tharoor and anand sharma defended manmohan singh
congress leaders shahi tharoor and anand sharma defended manmohan singh

नवी दिल्ली : आधी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि आता राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विरुद्ध तरुण फळी हा वाद पुन्हा समोर आला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आहेत. मनमोहनसिंग यांना लक्ष्य केले जात असल्याने माजी केंद्रीय मंत्री शशि थरुर यांच्यासह अनेक जण पुढे आले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील वादामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. पक्षातील तरुण नेते पक्ष सोडून जात असल्याने पक्षात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ आणि तरुण या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा झाली. बैठकीत दोन गट पडले आणि काही वेळ त्यांच्यात जोरदार जुंपली. 

या बैठकीत तरुण नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांनी काँग्रेसच्या सातत्याने होत असलेल्या पिछेहाटीची जबाबदारी घ्यावी, असा सूर तरुण नेत्यांनी लावला. काही तरुण नेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणीही लावून धरली. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्या कोणाच्या नावावर एकमत होणे शक्य नसल्याने ते योग्य उमेदवार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. 

तब्बल चार तास चाललेल्या या व्हिडीओ बैठकीला मनमोहनसिंग हेही उपस्थित होते. ते या बैठकीत एकही शब्द बोलले नाहीत. या बैठकीत काही नेत्यांनी पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, काँग्रेस जनतेपासून दुरावत चालल्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यासारख्या नेत्यांना योग्य स्थान देण्यात पक्ष चुकला, असे परखड मतही काहींनी व्यक्त केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

या बैठकीनंतर मनमोहनसिंग यांच्या बचावासाठी माजी केंद्रीय मंत्री व खासदार शशि थरुर पुढे आले आहेत. त्यांनी म्हटल आहे की, यूपीए सरकारची दहा वर्षे ही मोठा बदल घडविणारी होती. मात्र, जाणीवपूर्वक तथ्यांची मोडतोड करुन यूपीएच्या कार्यकाळाची बदनामी करण्यात आली. आपल्या पराभवापासून शिकण्यासारख्या खूप गोष्टी असून, काँग्रेसला पुनरुज्जीवन देण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. मात्र, याचवेळी आपल्या विचारसरणीच्या शत्रू असलेल्यांच्या हातातील आपण बाहुले बनत आहोत. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की, सर्वच काँग्रेसजनांनी यूपीए सरकारच्या कार्यकाळाचा अभिमान बाळगावा, कोणताही पक्ष आपला भूतकाळ नाकारत नाही. भाजप आपल्याला श्रेय देईल अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. आपणच आपला आदर करायला हवा. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे योगदान इतिहासात नोंदविले जाईल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com