काँग्रेस दोनशेवरुन 44 वर कशी आली? राजीव सातव यांचा पक्ष नेतृत्वाला थेट सवाल - congress leader rajeev satav targets senior party leaders in meeting | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस दोनशेवरुन 44 वर कशी आली? राजीव सातव यांचा पक्ष नेतृत्वाला थेट सवाल

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ विरुद्ध तरुण हा वाद उफाळून आला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आहेत. काँग्रेसमध्ये यावरुन आता दोन गट पडले आहेत. 
 

नवी दिल्ली : आधी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि आता राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विरुद्ध तरुण फळी हा वाद पुन्हा समोर आला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आहेत. यावर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व राजस्थान प्रभारी राजीव सातव यांनी पक्षाला खडे बोल सुनावले आहेत. सर्वच पातळ्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील वादामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. पक्षातील तरुण नेते पक्ष सोडून जात असल्याने पक्षात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ आणि तरुण या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा झाली. बैठकीत दोन गट पडले आणि काही वेळ त्यांच्यात जोरदार जुंपली. 

या बैठकीत तरुण नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांनी काँग्रेसच्या सातत्याने होत असलेल्या पिछेहाटीची जबाबदारी घ्यावी, असा सूर तरुण नेत्यांनी लावला. काही तरुण नेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणीही लावून धरली. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्या कोणाच्या नावावर एकमत होणे शक्य नसल्याने तेच योग्य उमेदवार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेस नेते राजीव सातव यांनी पक्ष नेतृत्वाला सुनावले. ते म्हणाले की,  पक्षाने सर्वच पातळ्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पक्षाचे 2009 मध्ये 200 खासदार होते. ही संख्या 44 वर कशी घसरली हे आधी पाहायला हवे. आता तुम्ही सर्वजण याबद्दल बोलत आहात. तुम्ही सर्वजण त्यावेळी मंत्री होतात. तुम्ही कोठे अपयशी ठरलात हे आधी तपासायला हवे. यूपीए-2 च्या कार्यकाळापासून आपण कुठे चुकलो याचेही परीक्षण करावे. 

तब्बल चार तास चाललेल्या या व्हिडीओ बैठकीला मनमोहनसिंग हेही उपस्थित होते. ते या बैठकीत एकही शब्द बोलले नाहीत. या बैठकीत काही नेत्यांनी पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, काँग्रेस जनतेपासून दुरावत चालल्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यासारख्या नेत्यांना योग्य स्थान देण्यात पक्ष चुकला, असे परखड मतही काहींनी व्यक्त केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख