congress leader priya dutt supports sachin pilot and jyotiradtya scindia | Sarkarnama

यंग ब्रिगेडमधील मोहरे गळू लागल्याने काँग्रेस नेते अस्वस्थ

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 जुलै 2020

राजस्थानमधील बंडानंतर सचिन पायलट यांची प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यावरुन आता पक्षातून ज्योतिरादित्य यांना समर्थन मिळू लागले आहे. 

भोपाळ : राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची पक्षाने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. पायलट यांचे बंड अखेर चहाच्या पेल्यातील वादळ ठरल्याचे चित्र आहे. यावर मुंबईतील काँग्रेस नेत्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांनी पायलट यांची बाजू घेतली आहे. 

राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते. 

आता यंग ब्रिगेडमधील सचिन पायलट यांनी बंड केले. त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. मात्र, अशोक गेहलोत यांनी पायलट यांचे बंड हाणून पाडले. अखेर पायलट यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी होण्यासोबत उपमुख्यमंत्रिपदही काढून घेण्यात आले. पायलट बंड अखेर फसले असून, गेहलोत यांनी राज्यावरील पकड पुन्हा घट्ट केली आहे. याचबरोबर पायलट समर्थक दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. 

याच यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद आहेत. उत्तर प्रदेशमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद यांनी उघडपणे पायलट यांचे समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. यामुळे प्रसाद हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये पक्षासाठी ब्राह्मण समाजाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. तेव्हापासून प्रसाद यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. प्रसाद यांनी प्रियांका यांना थेट विरोध केलेला नसला तरी ते नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

जितिन प्रसाद यांनी पायलट यांचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सचिन पायलट हे केवळ माझ्यासोबत काम करणारे व्यक्ती नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांनी समर्पण भावनेतून पक्षासाठी केलेल्या कामाचे श्रेय कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. लवकरच या परिस्थितीत सुधारणा होईल. अशी परिस्थिती ओढवल्याबद्दल मला दु:ख वाटते. 

जितिन प्रसाद यांच्यानंतर आता प्रिया दत्त यांनी पायलट यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आणखी एक मित्र पक्ष सोडून गेला. सचिन आणि ज्योतिरादित्य हे दोघेही माझे चांगले सहकारी आणि मित्र आहेत. दुर्दैवाने दोन मोठे नेते आणि भविष्यात आणखी मोठी वाटचाल करण्याची क्षमता असलेले दोघेही पक्ष सोडून गेले आहेत. महत्वकांक्षा असणे हे चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. त्यांनी कठीण काळात पक्षासाठी कठोर परिश्रम घेतले होते.

Edited by Sanjay jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख