मोदीजी हट्ट सोडा, राम मंदिरात विघ्न आणण्यास कारण बनू नका : दिग्विजयसिंह - congress leader digvijay singh demands ram mandir bhoomi pujan should be postponed | Politics Marathi News - Sarkarnama

मोदीजी हट्ट सोडा, राम मंदिरात विघ्न आणण्यास कारण बनू नका : दिग्विजयसिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमावरुन होणारा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. या कार्यक्रमाला अनेक जण आक्षेप घेऊ लागले आहेत. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  ५ ऑगस्टला होणार आहे. हा मुहूर्त अशुभ असल्याने मोदींनी भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी सूचना ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे. मुहर्त अशुभ असल्याने भाजप नेत्यांना कोरोना होत आहे, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. या कार्यक्रमाचे निमंत्रण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना मिळाले आहे. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना मात्र, निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. अडवानी, जोशी आणि उमा भारती हे सर्वजण बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आरोपी आहेत. 

अडवानी आणि जोशी यांनाच राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमातून डावलल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. याचबरोबर भाजपमध्येही याबद्दल नाराजीचा सूर होता. अखेर अडवानी आणि जोशी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावतील, असे सांगण्यात आले आहे. अडवानी आणि जोशी यांची अशा प्रकारे व्हर्च्युअल उपस्थिती कार्यक्रमाला असेल. 

दिग्विजयसिंह यांनी भूमिपूजन पुढे ढकलावे, अशी सूचना ट्विटरवर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राम मंदिराचे भूमिपूजन करण्यास 5 ऑगस्ट हा मुहूर्त अशुभ असून, तो पुढे ढकलावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिराचे बांधकाम सुरू होत आहे. पंतप्रधानांनी हट्ट सोडावा अन्यथा यामुळे राम मंदिराच्या कामात अडथळे निर्माण होतील. या अशुभ मुहू्र्ताबाबत स्वामी स्वरुपानंद यांनीही इशारा दिलेला होता. मोदी हे हजारो वर्षांपासून असलेल्या परंपरांपेक्षा मोठे आहेत का? हेच हिंदुत्व आहे का? 

राम मंदिराच्या पुजाऱ्यांसह 14 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता केंद्रीय गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर उत्तर प्रदेशात एका मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यभ कोरोना पॉझिटिव्ह असून, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही पॉझिटिव्ह आले आहेत. आता मोदी अशुभ मुहूर्तावर भूमिपूजन करुन आणखी किती जणांना रुग्णालयात पाठवणार आहेत. योगी आदित्यनाथ यांनीच आता मोदींची समजूत काढावी. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख