दोन दिवसांपासून पायलट संपर्कात नाहीत; काँग्रेसच्या राजस्थान प्रभारींची कबुली

राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षातील वाद शमण्याची चिन्हे नसून, सचिन पायलट यांच्याशी पक्षाला संपर्कही करता येत नसल्याचे समोर आले आहे.
congress leader avinash pande said he has not been able to reach sachin pilot
congress leader avinash pande said he has not been able to reach sachin pilot

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. याचवेळी काँग्रेस पक्षाकडून राज्यातील वादळ शमविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अविनाश पांडे हे दोन दिवसांपासून पायलट यांच्याशी संपर्क साधत असतानाही त्यांच्यापर्यंत पोचू शकलेले नाहीत. खुद्द पांडे यांनीच याची कबुली दिली आहे.

उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हे काही आमदारांसह दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. गेहलोत यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक आज रात्री बोलाविली आहे. या बैठकीला सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनाही पाचारण करण्यात आले आहे. 

पायलट यांनी उघडपणे संघर्षाची भूमिका घेतल्याने राज्य पातळीवर सर्व सूत्रे गेहलोत यांनी स्वत:च्या हाती घेतली आहेत. याचाच भाग म्हणून आमदारांची बैठक बोलाविण्यात आली आहे. ही बैठक आज रात्री 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे. अनेक मंत्री आणि आमदारांनी गेहलोत यांना दूरध्वनी करुन पाठिंबा दर्शविला आहे. याचबरोबर गेहलोत यांनी उद्या सकाळी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे उपस्थित राहणार आहेत. 

सचिन पायलट यांच्याशी मी मागील दोन दिवसांपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मी त्यांना संदेशही पाठवले आहेत, असे अविनाश पांडे यांनी सांगितले. राज्यातील काँग्रेस सरकारला कोणताही धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आता पायलट यांनी पक्षाशी संपर्कच तोडून टाकल्याने त्यांच्या पुढील पावलाबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहेत. 

राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत हेवेदाव्यांबाबत माध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले होते की, मुख्यमंत्री बनण्याची इच्छा अनेकांची असते. आमच्या पक्षात पाच ते सात जण मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. परंतु, जेव्हा पक्ष निर्णयानुसार एक जण मुख्यमंत्री होतो तेव्हा अन्य जण त्याला पाठिंबा देत असतात. आमच्या पक्षात कोणताही वाद नाही. सर्व शांतता आहे. 

जेव्हा एकाला मुख्यमंत्री केले जाते तेव्हा अन्य इच्छुकांनी शांत बसणे अपेक्षित असते, असे सांगत अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत हे सचिन पायलट यांना प्रदेश अध्यक्ष व उपमुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा दबाब आणू शकतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. असे झाले तर राजस्थानच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते. 

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलविली होती. ही बैठक दोन तास चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. कारण ते दिल्लीला गेले होते. या बैठकीत मुख्यमंत्री गेहलोत यांनी अनेक मुद्दावर आपले मत मांडले पण सचिन पायलट यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीत अनेक प्रश्न निर्माण केले. सूत्रांच्या माहितीनुसार राजस्थानमधील 22 आमदार हे सध्या दिल्लीत आहेत. हे आमदार पक्षश्रेष्ठींकडे पक्षातील अंतर्गत तक्रारी मांडणार आहेत.    

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com