काँग्रेसला वेध बिहारमध्ये सत्तास्थापनेचे; सुरजेवाला, पांडे यांच्याकडे निरीक्षकपद - Congress Eyeing on Government Formation in Bihar | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसला वेध बिहारमध्ये सत्तास्थापनेचे; सुरजेवाला, पांडे यांच्याकडे निरीक्षकपद

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतदानोत्तर कल चाचणीतून नितीशकुमार सरकारच्या गच्छंतीची चाहूल लागल्याने काँग्रेसमध्ये पुढील रणनितीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी बिहारसाठी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतदानोत्तर कल चाचणीतून नितीशकुमार सरकारच्या गच्छंतीची चाहूल लागल्याने काँग्रेसमध्ये पुढील रणनितीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी बिहारसाठी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

बिहारमध्ये काल मतदान पूर्ण झाले असून मंगळवारी (ता. १०) मतमोजणी होणार आहे. कालच्या मतदानोत्तर कलचाचणीतून राजद-काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार स्थापन होऊ शकेल, असे संकेत मिळाल्याने काँग्रेस नेतृत्वाचा उत्साह वाढला आहे. बिहारमध्ये पक्षविस्ताराच्या संधीसाठी सत्तेत मानाची भागीदारी आवश्यक असल्याने पुढील तयारीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच निरीक्षक नेमण्याचा निर्णय झाला आहे.

निवडणुकीदरम्यान बिहारमध्ये ठाण मांडून राहिलेले सरचिटणीस आणि माध्यमविभाग प्रमुख सुरजेवाला आणि उमेदवार छाननी समितीचे प्रमुख असलेले माजी सरचिटणीस अविनाश पांडे यांच्याकडेच निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दोघेही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून संभाव्य घडामोडींचा अदमास घेऊन निर्णय करतील.

एरव्ही निकालानंतर विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी नवनिर्वाचित आमदारांचा कल जाणून घेण्यासाठी दिल्लीतून निरीक्षक पाठवण्याची परंपरा राहिली असली तरी आताची परिस्थिती वेगळी असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपकडून सरकार पाडण्यासाठी झालेले प्रयत्न ताजे आहेत. ते पाहता बिहारमध्ये असे प्रकार टाळणे, आमदारांची एकजूट राखणे आणि छोटे पक्ष, अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी आतापासूनच तयारीला लागण्याचाही हा भाग असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

मतदानोत्तर कल चाचणीमध्ये एनडीएच्या तुलनेत महाआघाडीला बहुतांश सर्वेक्षण संस्थांनी झुकते माप दिले आहे. टाइम्स नाऊ सी वोटरने एनडीएला ११६ तर महाआघाडीला १२० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तर टुडेज-
चाणक्यने एनडीएला ५५ जागा आणि महागठबंधना १८० जागा मिळण्याचे भाकीत वर्तविले आहे. रिपब्लिक-जन या संस्थेने एनडीएला ९१ जागा मिळतील आणि महाआघाडीला ११७ जागा मिळतील असे म्हटले आहे. तर एबीपी-सीवोटरने एनडीए १०४, महाआघाडी १२८ जागा जिंकेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. टीव्ही ९ भारत वर्षनेही एनडीए ११० जागांवर मर्यादीत राहील आणि महाआघाडीला १२० जागा मिळून सत्तासोपान गाठता येईल, असा अंदाज वर्तविला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख