मोठी बातमी : सीमेवर चीनने तैनात केले होते मार्शल आर्ट फायटर

भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षाआधी चीनने सीमेवर मार्शल आर्ट फायटर आणि गिर्यारोहक तैनात केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
china sent martial art fighters to ladakh before galwan valley clash
china sent martial art fighters to ladakh before galwan valley clash

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात तणाव निर्माण झाला होता. येथे संघर्ष होण्याची शक्यता गृहित धरुन चीनने सीमा सुरक्षा दलांमध्ये मार्शल आर्ट फायटर आणि गिर्यारोहकांचा समावेश करुन त्यांना लडाखमध्ये सीमेवर तैनात केले होते. गल्वानमधील संघर्षाआधी सुमारे महिनाभर त्यांना तैनात करण्यात आले होते, अशी कबुली 'चायना नॅशनल डिफेन्स न्यूज' या चीनच्या सैन्याच्या अधिकृत वृत्तपत्राने दिली आहे. 

भारत आणि चीनमध्ये लडाखधील डोंगराळ भागात कायम तणावाचे वातावरण असते. मात्र, 15 जूनला झालेला संघर्ष हा मागील 50 वर्षांत झालेला सर्वांत भीषण ठरला होता. यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. आता 'चायना नॅशनल डिफेन्स न्यूज'ने म्हटल्यानुसार, तिबेटच्या राजधानीत ल्हासामध्ये एव्हरेस्ट शिखरावर ऑलिंपिक ज्योत नेणारे पथक आणि मिस्क्ड मार्शल आर्ट क्लबमधील फायटर पोचले होते. अशा प्रकारचे हजारो सैनिक तिबेटच्या राजधानीत पोचले होते. तातडीने उत्तर द्यायचे झाल्यास असे सैनिक उपयोगी ठरतील, अशी योजना होती. कारण ते डोंगराळ भागात जाण्यास प्रशिक्षित आणि युद्धजन्य परिस्थितीत संघर्षास कायम तयार होते. 

चीनच्या सैन्य अधिकाऱ्याने वृत्तपत्राशी बोलताना याला दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांची नेमणूक ही सध्या सीमेवर असलेल्या तणावामुळे करण्यात आली आहे, याबद्दल त्यांनी बोलण्यास नकार दिला. यामुळे गल्वान खोऱ्यातील संघर्षाची चीनने आधीपासूनच तयारी केली असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, भारत आणि चीनच्या कोअर कमांडर पातळीवरील नुकत्याच झालेल्या चर्चेत अखेर दोन्ही बाजूंनी पूर्व लडाखमधून आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय परस्परसहमतीने घेतला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमधील संघर्षग्रस्त भागातून भारत आणि चीनने आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बाजू याची कार्यवाही करणार आहेत. 

भारत आणि चीनमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी मागील महिन्यापासून चर्चा सुरू आहे. मात्र, 15 जूनला भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले होते. यात चीनचेही काही सैनिक ठार झाल्याचा दावा भारतीय लष्कराने केला आहे. मात्र, नेमकी संख्या लष्कराने जाहीर केलेली नाही. चीनच्या सैन्यानेही त्यांच्या ठार झालेल्या जवानांचा आकडा सांगितलेला नाही. 'एएनआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत. तसेच, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात चीनचे सुमारे 35 सैनिक मारले गेल्याचे म्हटले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com