चिनी ड्रॅगनला आता लडाखनंतर घ्यायचाय भूतानचा घास...

चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे शेजारी देशांची डोकेदुखी वाढली. भारतातही लडाख खोऱ्यात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. आता चीनने भूतानकडे मोर्चा वळविला आहे.
china now claims bhutan animal sanctuary and announces package for it
china now claims bhutan animal sanctuary and announces package for it

बीजिंग : चीनकडून शेजारील देशांच्या भूभागावर दावा करण्याचे प्रकार सुरूच आहेत. भारतात पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली होती. यामुळे भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले होते. यानंतर दोन्ही देशांत तणाव असून, तो कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. आता चीनने भूतानकडे मोर्चा वळविला आहे. 

चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे सर्व शेजारी देश त्रस्त आहे. अनेक छोट्या देशांमध्ये चीन आर्थिक गुंतवणुकीच्या नावाखाली घुसखोरी करीत आहे. हाच प्रकार आता चीनने भूतानच्या बाबतीत सुरू केला आहे. चीनने आता भूतानच्या साकतेंग वन्यजीव अभयारण्यावर दावा केला आहे. त्याचे समर्थन करण्यासाठी चीनने अभयारण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. चीन आणि भूतान यांच्यातील सीमा अद्याप निश्‍चित झालेल्या नाहीत. त्यामुळे तोडगा म्हणून साकतेंग वन्यजीव अभयारण्यासाठी पॅकेज देता येईल, असे आमिष चीनने दाखवले आहे. 

यासंदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, की दोन्ही देशांतील सीमा अद्याप निश्‍चित झालेल्या नाहीत. याबाबत आमची भूमिका स्पष्ट असून मध्य, पूर्व आणि पश्‍चिम भागाबाबत वाद आहे. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी आम्ही पॅकेज देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेऊ नये, असे आमचे मत आहे. अशा प्रकारचे पाऊल उचलल्यास त्याला चीनचा विरोध असेल. या मुद्द्यावरून आम्ही संबंधित देशाच्या संपर्कात आहोत. 

काही दिवसांपूर्वी चीनने जागतिक पर्यावरण केंद्र परिषदेत या अभयारण्यावर दावा केला होता. त्यावेळी चीनने या अभयारण्याला निधी देण्यास विरोध केला होता. जागतिक बँकेसाठी भूतान, भारत, बांगलादेश, मालदिव आणि श्रीलंकेच्या प्रतिनिधी म्हणून काम पाहणाऱ्या अपर्णा सुब्रमणी यांनी जागतिक पर्यावरण केंद्र परिषदेने साकतेंग अभयारण्यासाठी निधी मंजूर केला असल्याचे सांगितले. तसेच, भूतानने चीनचे दावे फेटाळून लावले असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

चीन आणि भूतानमध्ये राजनैतिक संबंध नाहीत, परंतु दोन्ही देश वेळोवेळी होणाऱ्या अधिकारी पातळीवरील बैठकांच्या माध्यमातून संपर्कात आहेत. सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या २४ फेऱ्या झाल्याआहेत. चीनने भारतासोबत लडाखवरून वाद उकरून काढलेला असताना भूतानच्या काही भागावरही दावा केला होता.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com