इतिहासात प्रथमच चार दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांचा खात्मा - chiefs of four terrorist outfits killed in jammu and kashmir | Politics Marathi News - Sarkarnama

इतिहासात प्रथमच चार दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 21 जून 2020

इतिहासात प्रथमच जम्मू- काश्मीरमधील प्रमुख चार दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांच्या खात्मा झाला आहे. सुरक्षा दलांनी मागील चार महिन्यांत ही कारवाई केली आहे. 

श्रीनगर : जम्मू -काश्मीरमधील लष्करे तैयबा, जैशे महम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि अन्सार गजवत-उल-हिंद या चार मुख्य दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांचा खात्मा झाल्याचे इतिहासात प्रथमच घडले आहे. मागील चार महिन्यांत सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. 

कुमार म्हणाले की, इतिहासात प्रथमच अशा प्रकारची कारवाई झाली आहे. मी याबद्दल सुरक्षा दलांचे अभिनंदन करतो. लष्करे तैयबा, जैशे महम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि अन्सार गजवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनांचे म्होरके मारले गेले आहेत. म्होरकेच मारले गेल्याने या संघटनांची मोठी हानी झालेली आहे. मागील चार महिन्यांत ही कारवाई करण्यात आली आहे. 

मागील दोन दिवसांत सुरक्षा दलांनी दोन यशस्वी कारवाया केल्या आहेत. यात सुरक्षा दलांची कोणतीही हानी झाली नाही. कुलगामध्ये शनिवारी झालेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. मात्र, दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील होता आणि तो जैशे महम्मदसाठी काम करीत होता. तो गेल्या तीन वर्षांपासून कुलगाममध्ये सक्रिय होता, असे कुमार यांनी सांगितले. 

कथुआमध्ये सीमा सुरक्षा दलाने हेरगिरी करणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले. यातून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही शस्त्रे दहशतवाद्यांसाठी आणली गेली असावीत, असा संशय आहे. एके47, एम4 कार्बाईन आणि पिस्तुल अशी शस्त्रे दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आली आहेत. ड्रोनमध्ये सापडलेली एम4 रायफल पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. 

श्रीनगरमधील झबिदाल येथील चकमकीबद्दल बोलताना कुमार म्हणाले की, ते स्थानिक दहशतवादी होते. त्या तीन दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांनी सुरक्षा दलांवर हातबाँब फेकले. नंतर झालेल्या चकमकीत तिघेही ठार झाले. यातील दोघांची ओळख पटली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख