धक्कादायक : ओबामा, बेजोस, गेट्स यांच्यासोबत भारतीयांचीही ट्विटर अकाउंट हॅक - central government issued notice to twitter about recent hack attack | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : ओबामा, बेजोस, गेट्स यांच्यासोबत भारतीयांचीही ट्विटर अकाउंट हॅक

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 जुलै 2020

जगभरात अनेक बड्या व्यक्तींची ट्विटर अकाउंट हॅक झाली होती. अखेर याची दखल केंद्र सरकारने घेतली असून, या प्रकरणी ट्विटरला नोटीस बजावली आहे. 

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, अॅमेझानचे सीईओ जेफ बेजोस, मायक्रोसॅाफ्टचे संस्थापक बिल गेट्स, अमेरिकेतील अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांची ट्विटर अकाउंट नुकतीच हॅक झाली होती. संबंधित हॅकरने याबाबत टि्वट करुन बिटकॉइनची मागणी केली होती. यात काही भारतीय यूजर्सची अकाउंट हॅक झाल्याचेही समोर आले आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकारने ट्विटरला नोटीस बजावली आहे. 

सायबर सुरक्षेची नोडल एजन्सी असलेल्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) या संस्थेने ही नोटीस बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक हायप्रोफाईल यूजर्सची अकाउंट नुकतीच हॅक झाली होती. यात काही भारतीय यूजर्सची अकाउंटही हॅक झाली होती. या प्रकरणी कंपनीने संपूर्ण माहिती सादर करावी. हॅक झालेल्या ट्विटरवर अकाउंटवरुन काही ट्विट करण्यात आली होती. या ट्विटला किती भारतीय यूजर्सनी भेट दिली अथवा त्यातील लिंकवर किती भारतीय यूजर्सनी क्लिक केले याचीही माहिती सरकारने ट्विटरकडे मागितली आहे. 

अशा प्रकारचे सायबर हल्ले, त्यातून यूजर्सच्या माहितीची होणारी चोरी, सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती आणि यावर ट्विटरकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना यांची माहिती सादर करण्यासही सरकारने सांगितले आहे. हॅकर्सनी ट्विटरच्या सिस्टीमचा अॅक्सेस मिळवून जगातील आघाडीचे उद्योजक, राजकारणी आणि सेलिब्रेटी यांची अकाउंट नुकतीच हॅक केली होती. यानंतर सीईआरटी-इन संस्थेने तातडीने पावले उचलून भारतीय यूजर्सच्या सुरक्षेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत ट्विटरकडे विचारणा केली आहे. 

अमेरिकेतील प्रसिद्ध पॅाप स्टार केन वेस्ट, टीव्ही कलाकार किम कर्दशियन वेस्ट, उद्योगपती माइक ब्लूम्बर्ग यांचेही अकाउंट हॅक करण्यात आले होते. त्यांच्याकडून हॅकर्सनी बिटकॉइनची मागणी केली होती. बिल गेट्स यांच्या अकाउंटवरून 1000 बिटक्वाइन्सवर 2000 बिटक्वाइन्स परत देणार असे लिहिले होते. या हॅक झालेल्या सर्व अकाउंटवर ट्विटरने पुन्हा ताबा मिळविला आहे. परंतु याबाबतची चैाकशी सुरूआहे. हॅकर्सची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. जे अकाउंट हॅक झाले होते. त्यांचे किमान १० लाखांपेक्षा अधिक फॅालोअर्स आहेत.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख