विद्यार्थ्यांनो आभासी जगात सावध रहा; 'सीबीएसई'चा इशारा

इंटरनेटच्या आभासी जगतात किशोरवयीन विद्यार्थ्यांना आपली सुरक्षा करता यावी, या हेतूने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शक नियम प्रसिद्ध केले आहेत.
cbse issues advisory for students on virtual reality and pornography
cbse issues advisory for students on virtual reality and pornography

नवी दिल्ली : ऑनलाइन मैत्रीसाठी मर्यादा, सूडबुद्धीने केलेल्या अश्लीलतेबाबत इशारा असे धडे वयात येणाऱ्या पिढीला मिळावेत, हा 'सीबीएसई'चा उद्देश आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणाकडे कल वाढला असतानाच विद्यार्थ्यांचा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापरही वाढला आहे. परिणामी, सायबर गुन्ह्यांना ते बळी पडण्याचा धोकाही वाढला आहे.

यापासून किशोरवयीन विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा आणि संभाव्य धोक्यांची त्यांना कल्पना यावी, यासाठी 'सीबीएसई'ने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तिका तयार करून ती शाळांकडे वितरीत केली आहे. यामध्ये विद्यार्थी तसेच पालकांसाठीही काय करावे आणि काय करू नये, यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

रिव्हेंज पोर्नोग्राफीबाबत इशारा 

सीबीएसईच्या पुस्तिकेत रिव्हेंज पोर्नोग्राफीबाबत विद्यार्थ्यांना सावध करण्यात आले आहे. १४ ते १८ या वयोगटातील विद्यार्थी या प्रकाराला बळी पडू शकतात. चिंतेची बाब म्हणजे त्रास देणारेही याच वयोगटातील असतात. या वयातील काही मुलेमुली संबंध ठेवतात, फोटो काढतात आणि संबंध तुटल्यावर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले त्यांना दिसतात. अशावेळी त्यांच्याच सहकाऱ्यांकडून थट्टा, अपमान होतो. विशेषतः मुलींना त्यांच्या एक्स बॉयफ्रेंडकडून किंवा ऑनलाइन मित्राकडून असा धोका संभवतो. 

काय आहेत मार्गदर्शक सूचना? 

- विद्यार्थ्यांनी किती जणांशी ऑनलाइन मैत्री करावी आणि प्रत्यक्षातील मित्रांशी कितीवेळ ऑनलाइन गप्पा माराव्यात, हे शिकून घ्यावे 
- ते शेअर करत असलेले शब्द, फोटो आणि व्हिडिओ यांना मर्यादा हवी 
- विद्यार्थी ऑनलाइन असताना त्यांच्या अॅक्टिव्हिटी कोण पहात आहे, त्याचा वापर-गैरवापर कोण करत आहे, यावर कदाचित त्यांचे नियंत्रण नसेल, हे लक्षात ठेवावे 
- रिव्हेंज पोर्नोग्राफीबाबत सावध रहावे 
- अडचण आल्यास मार्गदर्शन घ्यावे आणि पालकांशी संवाद साधावा 
- आपल्या माहितीचा दुसऱ्यांना कसा वापर करू द्यावा, त्याला परवानगी द्यावी का, याबाबत पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे 
- आपल्याला विश्वासाने शेअर केलेली माहिती, फोटो, व्हिडिओ संबंधितांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर व्हायरल करू नये 
- तुम्ही ज्यांना कधीही भेटला नाहीत, त्यांच्याशी ऑनलाइन मैत्री करू नका 
- नकार पचविणे शिका, हा आयुष्याचा एक भाग आहे, जगाचा शेवट नाही 
- ऑनलाइन मैत्री झाल्यावर कोणी अल्पकाळातच तुमच्या दिसण्याची अतिस्तुती करत असल्यास त्यांच्यापासून दूर रहा, त्यांना कोणतीही माहिती शेअर करू नका 
- सायबर गुन्हेगार बनावट अकाउंट तयार करून इतरांना आर्थिक, लैंगिक आणि शारीरिक हानी पोहचविण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे सावध रहावे 

किशोरवयीन विद्यार्थ्यांनी मुला-मुलींमधील मैत्री समजून घ्यावी. मुलांनी मुलींबरोबर समान पातळीवर संवाद साधावा. त्यांचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे हे लक्षात ठेवून त्यांचा आणि त्यांच्या इच्छेचा, मतांचा मान ठेवावा. पोकळ आदर नको. 
- सीबीएसई 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com