केवळ प्रसिद्धी करुन आत्मनिर्भर होता येत नाही; मायावतींचा भाजपला टोला

भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर आता केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये जुंपली आहे. यात आता बहुजन समाज पक्षानेही सरकारला टोला लगावला आहे.
bsp supremo mayawati slams bjp government over atmanirbhar bharat mission
bsp supremo mayawati slams bjp government over atmanirbhar bharat mission

नवी दिल्ली : काँग्रेसच्या आधीच्या उदाहरणांमधून भाजपने धडा घेण्याची आवश्यकता आहे. भाजपने भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. केवळ प्रसिद्धी करुन आत्मनिर्भर भारत बनवता येणार नाही, असा टोला बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज भाजपला लगावला. 

देशातील इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. मायावती म्हणाल्या की, देशावर आधीच कोरोनाचे संकट आले आहे. यामुळे जनतेचे हाल सुरु आहेत. यातच आता सातत्याने इंधन दरवाढ सुरू असल्याने नागरिकांच्या समस्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. केंद्र सरकारने इंधनदर नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे. 

बहुजन समाज पक्षाची स्थापना मागास वर्ग, आदिवासी आणि धर्मांतरित अल्पसंख्याक यांच्या हितासाठी झालेली होती. पक्षाची स्थापन झाली त्यावेळी काँग्रेस सत्तेत होती. वंचित वर्गातील लोकांसाठी काँग्रेसने काही पावले उचलली असती तर, आम्हाला बहुजन समाज पक्षाची स्थापना करावी लागली नसती. आमचा पक्ष हा कोणाच्या हातातील खेळणे नाही, हे मला भाजप आणि काँग्रेसला सांगावेसे वाटते. राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेला हा स्वतंत्र पक्ष आहे, असे मायावती यांनी सांगितले. 

कोरोना संकटाच्या काळात स्थलांतरित कामगार त्यांच्या मूळ राज्यात परतले आहेत. काँग्रेस सत्तेत असताना हे कामगार इतर राज्यांमध्ये रोजीरोटीसाठी गेले होते. काँग्रेसने त्यांच्या मदतीसाठी काहीही केलेले नाही. काँग्रेसने योग्य पावले उचलली असती तर, ते इतर राज्यात रोजगारासाठी गेलेच नसते, असे मायावती यांनी नमूद केले. 

भारत-चीन सीमावादाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आहोत, अशी भूमिकाही मायावती यांनी घेतली. त्या म्हणाल्या की, भारत-चीन सीमावादाच्या मुद्द्यावर भाजपसोबत बहुजन समाज पक्ष उभा आहे. या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप हे देशहिताचे नाहीत. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. देशातील राजकीय गोंधळामुळे चीनला फायदा होऊ शकतो. या परिस्थितीचा चीनने फायदा उठविल्यास देशाचे मोठे नुकसान होईल. 

भारत आणि चीनमधील संघर्षाच्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याचवेळी इतर विरोधी पक्षही या मुद्द्यावरुन लक्ष्य करु लागल्याने भाजप एकाकी पडल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत भाजपच्या मदतीसाठी मायावती उभ्या राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com