माऊंटबॅटनची पत्नी एडविनाच्या पत्रांत भारताविषयी दडलंय काय? पत्रं सार्वजनिक करण्यास ब्रिटनचा नकार - British government blocks Mountbatten diaries and Edwina letters | Politics Marathi News - Sarkarnama

माऊंटबॅटनची पत्नी एडविनाच्या पत्रांत भारताविषयी दडलंय काय? पत्रं सार्वजनिक करण्यास ब्रिटनचा नकार

वृत्तसंस्था
रविवार, 16 मे 2021

भारताची फाळणी आणि एडविना यांचे नात्याविषयीची गुपितं सार्वजनिक होण्याची भिती वाटत असल्याचे माऊंडबॅटनवर पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाने म्हटले आहे.

लंडन : भारताचे शेवटचे व्हाईसरॅाय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॅार्ड माऊंटबॅटन आणि त्यांच्या पत्नी एडविना यांची डायरी व पत्रं सावर्जनिक करण्यास ब्रिटिश सरकारने नकार दिला आहे. भारताची फाळणी आणि एडविना यांचे नात्याविषयीची गुपितं सार्वजनिक होण्याची भिती वाटत असल्याचे माऊंडबॅटनवर पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाने म्हटले आहे. त्यामुळे ब्रिटिश कॅबिनेट व साऊथहॅम्पटन यूनिव्हर्सिटीने ही पत्रं खुली करण्यास मनाई केली आहे. (British government blocks Mountbatten diaries and Edwina letters)
 
लेखक अॅंड्र्यू लोवनी हे मागील चार वर्षांपासून डायरी व पत्रं सावर्जनिक होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च केला आहे. पण त्यांच्या प्रयत्नांवर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे. गार्डियन वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, २०१० मध्ये लॅार्ड माऊंटबॅटन यांची डायरी आणि एडविना यांची काही पत्र संरक्षित करण्यात आली आहेत. साऊथहॅम्पटन यूनिव्हर्सिटीने ही पत्रं २.८ मिलियन पाऊंडमध्ये खरेदी केली आहेत. त्यासाठी विद्यापीठाने अनेकांकडून निधी घेतला. 

हेही वाचा : कोव्हॅक्सिन लशीचा डोस ठरतोय 'डबल म्यूटंट' कोरोनाचा कर्दनकाळ

लोवनी यांच्या म्हणण्यानुसार, संरक्षित करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये शाही परिवार आणि भारताच्या फाळणीविषयीची नवीन माहिती समोर येऊ शकते. माऊंटबॅटन हे राजकुमार फिलीप यांचे चुलते होते. माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे जवळचे संबंध होते, असे लोवनी यांनी म्हटले आहे. 

पंडित नेहरू व एडविना यांच्या संबंधांविषयी...

माऊंटबॅटन यांच्या मुलगी पामेला हिक्स यांनी 'डॅाटर ऑफ एम्पायर : लाईफ इज ए माऊंटबॅटन' या पुस्तकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू व एडविना यांच्याविषयी लिहिले आहे. 'पंडित नेहरू व एडविना हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. तसेच एकमेकांचा सन्मान करत होते. माझी आई एकटेपणाची शिकार होती. अशावेळी एक संवेदनशील, आकर्षक, सुसंस्कृत व्यक्तिमत्व तिला भेटले. त्यामुळेच ती त्यांच्यावर प्रेम करू लागली,' असं पामेला यांनी पुस्तकात म्हटले आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख