नवी दिल्ली : जगातील अनेक हुकूमशहांची नावे 'एम' अक्षरांनी का सुरू होतात ? या कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या बोचऱ्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपने 'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव (मोहनदास) कोणत्या अक्षराने सुरू होते ते सांगा, असा पलटवार केला आहे. 'भारताची वसुधा (भूमी) वेगळीच आहे. येथे हुकूमशहा नव्हे तर महावीर व बुध्द जन्माला येतात. पण राहुल यांना हे कळणार नाही,' असा टोला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लगावला आहे.
Why do so many dictators have names that begin with M ?
Marcos
Mussolini
Milošević
Mubarak
Mobutu
Musharraf
Micombero— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 3, 2021
दरम्यान 'एम' फॉर हुकूमशहा या धर्तीच्या राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना भाजप नेते व ट्विटर सेनेने मोतीलाल नेहरू, डॉ. मनमोहनसिंग, ममता बॅनर्जी, एम के स्टॅलीन यांच्यापर्यंतच्या अनेकानेक विरोधी पक्षनेत्यांच्या नामावळीची आठवण करवून दिली आहे. राहुल गांधींनी, मार्कोस, मुसोलिनी, मिलोसेविक, होस्नी मुबारक, मोबुतू, मिकोमबेरो, मुशर्रफ आदी नावे देताना यांनी 'मोदी' हा उच्चार केला नसला तरी त्यांच्या ट्विटचा गर्भितार्थही स्पष्ट असल्याने भाजप खवळला आहे.
जावडेकर यांनी राहूल यांना ट्विटरद्वारे जोरदार प्रत्युत्तर देताना म्हटले की साबरमतीचे संत म्हणजेच बापूजींचे मोहनदास हे नावही 'एम' अद्याक्षरानेच सुरू होते. ते अहिंसा व सत्याचे महान पुजारी होते. या भारताची मातीच वेगळी आहे व येथे हुकूमशहा जन्मत नाहीत. पण जाऊ द्या, राहूल गांधी, तुम्हाला हे काही समजणारच नाही. हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी, अशी अज्ञानी ट्विट करणारे राहुल गांधी यांचे महात्मा गांधींबद्दलचे मत काय आहे, असा तिरकस सवाल विचारला आहे.
Edited By - Amit Golwalkar

