भाजपने कधीही वाजपेयींना दोष दिला नाही परंतु, दुर्दैवाने काँग्रेसमधूनच मनमोहनसिंग होताहेत लक्ष्य... - bjp never blamed vajpayee but congress leaders blame manmohan singh says manish tiwari | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने कधीही वाजपेयींना दोष दिला नाही परंतु, दुर्दैवाने काँग्रेसमधूनच मनमोहनसिंग होताहेत लक्ष्य...

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ विरुद्ध तरुण हा वाद उफाळून आला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आहेत. यावरुन काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत. 

नवी दिल्ली : आधी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि आता राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विरुद्ध तरुण फळी हा वाद पुन्हा समोर आला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आहेत. मनमोहनसिंग यांना लक्ष्य केले जात असल्याने त्यांच्या बचावासाठी काँग्रेस नेते मनीष तिवारी आणि मिलिंद देवरा आता सरसावले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील वादामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. पक्षातील तरुण नेते पक्ष सोडून जात असल्याने पक्षात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ आणि तरुण या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा झाली. बैठकीत दोन गट पडले आणि काही वेळ त्यांच्यात जोरदार जुंपली. 

या बैठकीत तरुण नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांनी काँग्रेसच्या सातत्याने होत असलेल्या पिछेहाटीची जबाबदारी घ्यावी, असा सूर तरुण नेत्यांनी लावला. काही तरुण नेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणीही लावून धरली. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्या कोणाच्या नावावर एकमत होणे शक्य नसल्याने ते योग्य उमेदवार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. 

तब्बल चार तास चाललेल्या या व्हिडीओ बैठकीला मनमोहनसिंग हेही उपस्थित होते. ते या बैठकीत एकही शब्द बोलले नाहीत. या बैठकीत काही नेत्यांनी पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, काँग्रेस जनतेपासून दुरावत चालल्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यासारख्या नेत्यांना योग्य स्थान देण्यात पक्ष चुकला, असे परखड मतही काहींनी व्यक्त केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

या बैठकीनंतर मनमोहनसिंग यांच्या बचावासाठी अनेक नेते पुढे येत आहेत. माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनीही या प्रकरणी पक्षाला ट्विटरवर खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भाजप हा 2004 ते 2014 ही दहा वर्षे सत्तेत नव्हता. त्यावेळी आधीच्या सरकारच्या कामगिरीबद्दल कोणीही वाजपेयी यांना दोष दिला नाही. याचवेळी काँग्रेसमध्ये मात्र, काही जण अपुऱ्या माहितीवर डॉ.मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला दूषणे देत आहेत. मनमोहनसिंग यांना लक्ष्य करण्याऐवजी त्यांनी राष्ट्रील लोकशाही आघाडी (एनडीए) आणि भाजपशी लढावे. 

काँग्रेस नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनीही पक्षाला सुनावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनमोहनसिंग 2014 मध्ये पदावरुन पायउतार झाले त्यावेळी इतिहास माझ्याबद्दल दयाळू असेल, असे म्हटले होते. आपल्याच पक्षाचे नेते त्यांची एवढ्या वर्षांची सेवा नाकारतील, अशी कल्पनाही त्यांनी त्यावेळी केली नसेल. त्यांच्याच उपस्थितीतच आता त्यांच्या कामाचे श्रेय नाकारले जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख