सारे विरोधी पक्ष भरकटले : प्रकाश जावडेकरांची टीका

विरोधकांना संसदेत बोलण्याचा, विरोध करण्याचा हक्कच आहे. त्याला वळसा घालून हे संसदेबाहेर प्रदर्शने करत होते, राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले. आता ते त्याच कायद्यांबाबत रस्त्यावर येऊन तक्रारी करत आहेत.संसदेत बोलण्यापासून यांचे हात कोणी धरले होते ? आपली घटनात्मक जबाबदारी टाळायची व नंतर आंदोलने करायची हा विचित्र प्रकार देशातील विरोधकांनी सुरू केला आहे, अशी टीका प्रकाश जावडेकर यांनी केली आहे
Prakash Jawdekar Criticism on Congress and Rahul Gandhi
Prakash Jawdekar Criticism on Congress and Rahul Gandhi

नवी दिल्ली : एकीकडे संसदेवर बहिष्कारच टाकायचा व तेथे उपस्थित राहिले तरी अत्यंत लाजिरवाणे वर्तन करून राज्यसभेची प्रतिष्ठा धुलीला मिळवायची आणि दुसरीकडे त्याच कायद्यांच्या विरोधात रस्त्यांवर आंदोलने करायची, अशी भूमिका घेणारे कॉंग्रेससह सारे विरोधी पक्ष चोराच्या उलट्या बोंबा मारत आहेत. हे सारे पक्ष दिशाहीन झाले असून भरकटले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केली.

दरम्यान भाजपने २००९ ते २०१४ या काळात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून संसदेपासून जंतरमंतरपर्यंत यापेक्षा वेगळी कोणती भूमिका वठविली होती व या काळातच लोकपाल विधेयकावरील चर्चेनंतर ऐन मध्यरात्री सर्व विरोधकांसह राज्यसभा प्रवेशद्वारापासून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चा कसा काढला होता, याचे सोयीस्कर विस्मरण सत्तारूढ मंत्रीगणांना झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपचे सध्याचे 'मूक मार्गदर्शक' लालकृष्ण अडवानी यांनी तर २००९ मध्ये लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले यूपीए-२ सरकारच संपूर्णपणे बेकायदेशीर (इल्लेजिटीमेट) असल्याचे वागबाण भर लोकसभेत सोडले होते याचीही आठवण जाणकार करून देतात.

आज बोलताना जावडेकर म्हणाले, "कामगारांच्या हिताची क्रांतीकारी विधेयके राज्यसभेत मंजूर होत होती तेव्हा या विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. जेव्हा कृषी विधेयकांवर मतविभाजन घेण्याची यांची मागणी मान्य करून त्यासाठी उपसभापती हरिवंश यांना जागांवर जाऊन बसण्याचे वारंवार आवाहन करत होते तेव्हा यांनी त्यांच्यवरच हल्ला करण्याचा निंदनीय प्रयत्न केला व आपल्या वर्तनाने राज्यसभेलाच मान खाली घालण्याची वेळ आणली. विरोधकांना जागेवर जाण्याचे आवाहन -विनंती हरिवंश यांनी तब्बल १३ वेळा केल्यानंतरही त्यांनी ती विनंती धुडकावून लज्जास्पद गोंदळ सुरू ठेवला,''

जावडेकर पुढे म्हणाले, "विरोधकांना संसदेत बोलण्याचा, विरोध करण्याचा हक्कच आहे. त्याला वळसा घालून हे संसदेबाहेर प्रदर्शने करत होते, राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले. आता ते त्याच कायद्यांबाबत रस्त्यावर येऊन तक्रारी करत आहेत.संसदेत बोलण्यापासून यांचे हात कोणी धरले होते ? आपली घटनात्मक जबाबदारी टाळायची व नंतर आंदोलने करायची हा विचित्र प्रकार देशातील विरोधकांनी सुरू केला आहे,''

दरम्यान केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी, "राहुल गांधी रोज कुठूनन तरी कविता-शेर उधार-उसनवार घेऊन ट्वीट करत बसतात,' असे टीकास्त्र सोडले आहे. राहूल गांधी यांना त्यांनी, 'लफ्फाजी का लॉलीपॉप' अशी शेलकी उपमा दिली. नक्वी म्हणाले की शेतकऱ्यांमध्ये विनाकारण भय व संभ्रम पसरवून दलालांची जहागीरदारी कायम ठेवण्याचा यांचा प्रयत्न देशाची जनता हाणून पाडेल.

हे (कॉंग्रेस) विरोध करतात, म्हणून शेतकरी व कामगारांसाठीचे ऐतिहासिक कायदे अजिबात मागे घेतले जाणार नाहीत, असे अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ठामपणे म्हटले आहे. मात्र भाजपने कितीही नकार दिला तरी प्रत्यक्षात पुढील संसदीय अधिवेशनातच, शेतकरी व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) २०२०, शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासनाचा करार २०२० आणि कृषि सेवा विधेयक या वादग्रस्त कृषी विधेयकांमध्ये एमएसपीच्या हमीसह कळीच्या दुरूस्त्या करणारी कायदादुरूस्ती करणे अपरिहार्य आहे, असा जोरदार मतप्रवाह सत्तारूढ गोटात आहे. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com