कमलनाथ यांचे सुंदर कांड तर, दिग्विजयसिंहांचे लंका कांड सुरू आहे... - bjp leader narottam mishra targets congress leaders digvijay singh and kamal nath | Politics Marathi News - Sarkarnama

कमलनाथ यांचे सुंदर कांड तर, दिग्विजयसिंहांचे लंका कांड सुरू आहे...

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमावरुन होणारा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. यावरुन काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आता जुंपली आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  ५ ऑगस्टला होणार आहे. हा मुहूर्त अशुभ असल्याने मोदींनी भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी सूचना ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे. भाजप नेते व मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या मुद्द्यावरुन दिग्विजयसिंह यांना लक्ष्य केले असून, कमलनाथ यांनाही या वादात ओढले आहे. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. या कार्यक्रमाचे निमंत्रण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना मिळाले आहे. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना मात्र, निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. अडवानी, जोशी आणि उमा भारती हे सर्वजण बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आरोपी आहेत. 

अडवानी आणि जोशी यांनाच राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमातून डावलल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. याचबरोबर भाजपमध्येही याबद्दल नाराजीचा सूर होता. अखेर अडवानी आणि जोशी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावतील, असे सांगण्यात आले आहे. अडवानी आणि जोशी यांची अशा प्रकारे व्हर्च्युअल उपस्थिती कार्यक्रमाला असेल. 

दिग्विजयसिंह यांनी भूमिपूजन पुढे ढकलावे, अशी सूचना ट्विटरवर केली आहे. राम मंदिराचे भूमिपूजन करण्यास 5 ऑगस्ट हा मुहूर्त अशुभ असून, तो पुढे ढकलावा, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. अशुभ मुहूर्तामुळे भाजप नेत्यांना कोरोना होत आहे, असा दावाही दिग्विजयसिंह यांनी केला आहे. 

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिग्विजयसिंह यांच्यासोबत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही या वादात ओढले आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्राचीन काळी धार्मिक कार्यक्रमांमध्ये असूर विघ्न आणत असत. आता त्याच प्रकारे काँग्रेस नेते राम मंदिराच्या भूमिपूजनात विघ्न आणत आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पाहिल्यास कमलनाथ हे 'सुंदर कांड' तर दिग्विजयसिंह 'लंका कांड' आयोजित करीत आहेत. भारतीस संस्कृती समजणाऱ्या व्यक्तींना राम मंदिराचा मुहूर्त काढला आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांनी मुहूर्त कोण शोधून काढला हे माहीत नाही. आमच्या नेत्यांचा संबंध या मुहूर्ताशी जोडणे चुकीचे आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख