तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या माजी मंत्री, विद्यमान आमदाराचा मृत्यू - Bihar's Former minister, MLA Mewalal Chaudhary dies due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या माजी मंत्री, विद्यमान आमदाराचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 19 एप्रिल 2021

त्यामुळे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना अवघ्या काही दिवसांतच मेवालाल चौधरी यांना पदावरून दूर करावे लागले होते.    

पटना : बिहारमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असून बिहारचे माजी मंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) विद्यमान आमदार मेवालाल चौधरी यांचा सोमवारी (ता. १९ एप्रिल) पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला. अवघ्या तीन दिवसांपूर्वी आमदार चौधरी यांचा कोरोनाचा रिपार्ट पॉझिटिव्ह आला होता. पटना येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशरात वेगाने पसरत आहे. त्यापासून गरीब-श्रीमंत अशी कुणाचीही सुटका नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्णांना पुरेशा सुविधाही मिळत नसल्याचे चित्र देशभर आहे. कारण, रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनचा तुटवडा देशभर जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दिल्लीने लॉकडाउनची घोषणा केली आहे.

तारापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे मेवालाल चौधरी यांना तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी पटनामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादम्यान सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. 

दरम्यान, विधानसभेच्या २०२० मधील निवडणुकीत मेवालाल चौधरी यांनी तारापूर विधानसभा मतदारसंघातून जेडीयू तिकिटावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत विजय मिळविलेल्या आमदार मेवालाल चौधरी यांची मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती केली होती. मुख्यमंत्र्यांनी चौधरी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाची धुरा सोपवली होती. मात्र, कलंकित नेत्याला राज्याचे शिक्षण मंत्री केल्याचा मुद्दा घेऊन विरोधकांनी चौधरी यांच्याविरोधात राज्यभर रान उठवले होते. त्यामुळे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना अवघ्या काही दिवसांतच मेवालाल चौधरी यांना पदावरून दूर करावे लागले होते.    

बिहारमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढ आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारी (ता. १८ एप्रिल) सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत बिहारमध्ये एकूण 1,00,604 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यासह आतापर्यंत एकूण 2,77,667 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 44,700 असून रुग्णांचा रिकव्हरी रेट 85.67 टक्के आहे. 

आरोग्य कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे अतिरिक्त वेतन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी रविवारी (ता. १८ एप्रिल) अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. बिहारमधील शाळा व महाविद्यालये येत्या 15 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमध्ये दररोज रात्री ९ ते पहाटे ५  वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे अतिरिक्त वेतन देण्याची घोषणाही नीतीशकुमार यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख