देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबाहेर परीक्षा सुरु  - Bihar Elections will be like Exam for Devendra Fadanavis | Politics Marathi News - Sarkarnama

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबाहेर परीक्षा सुरु 

मृणालिनी नानिवडेकर 
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

भाजपविरोधात महाराष्ट्रातले सर्व प्रमुख विरोधी पक्ष एकवटले असताना या कोंडीतून मार्ग काढता येईल का असा प्रश्न असतानाच फडणवीसांना वेगळ्या पीचवर खेळावे लागणार आहे. बिहारमध्ये भाजपने जिंकून येणाऱ्या जागांबाबत सातत्य राखले असले तरी  नितीश कुमार यांना 'अॅन्टी इन्कमबन्सी'चा सामना करावा लागू शकेल

मुंबई : महाराष्ट्रात सलग दोन निवडणुकात भाजपला प्रथमच शंभरावर जागा मिळवून देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची राज्याबाहेरची पहिली महत्वाची परीक्षा बिहार विधानसभा निवडणुकीनिमित्त सुरु होते आहे. शिवसेनेशी उत्तम संबंध ठेवण्याच्या प्रयत्नाला प्रतिसाद न मिळाल्याने जिंकूनही मुख्यमंत्रीपद हुकलेले नेते अशी फडणवीसांची सध्याची अवस्था आहे.

भाजपविरोधात महाराष्ट्रातले सर्व प्रमुख विरोधी पक्ष एकवटले असताना या कोंडीतून मार्ग काढता येईल का असा प्रश्न असतानाच फडणवीसांना वेगळ्या पीचवर खेळावे लागणार आहे. बिहारमध्ये भाजपने जिंकून येणाऱ्या जागांबाबत सातत्य राखले असले तरी  नितीश कुमार यांना 'अॅन्टी इन्कमबन्सी'चा सामना करावा लागू शकेल. सातत्याने तोच चेहरा अन प्रत्यक्षात न उतरलेल्या घोषणा या नितीशकुमार यांच्या समोरच्या समस्या आहेत तर समोर कुणीही प्रतिस्पर्धी नसणे ही मोठीच जमेची बाजू आहे.

मित्रपक्षाला न दुखावता भाजपला अधिकाधिक प्रभावी करण्याचे शिवधनुष्य फडणवीस यांना उचलावे लागेल.२८ अॉक्टोबर पासून सुरु होणाऱ्या या रणसंग्रामासाठी फडणवीस महाराष्ट्रातून कोणती कुमक नेतात, त्यांची व्यूहरचना काय, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या समवेत ते कशी पावले टाकतात, याकडे बिहारबरोबरच महाराष्ट्राचेही लक्ष असेल. सुशांतसिंह मृत्यूप्रकरण, स्थलांतरीत मजूर अशामुळे बिहारचा मुंबईशी संबंध अधिकच गहिरा झाला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या असून तीन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. २८ ऑक्‍टोबरला पहिल्या टप्प्यासाठी, दुसऱ्या टप्प्यासाठी तीन नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यासाठी सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. एकून २४३ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे अशी माहिती देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिली. तसेच दिवाळीपूर्वी म्हणजे दहा नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचेही अरोरा यांनी सांगितले 

आज देशभर शेतकऱ्यांनी कृषी आयोगाच्या विरोधात देश बंदची हाक दिली असताना दुसरीकडे बिहारसह मध्यप्रदेशमधील पोटनिवडणूकांच्या तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत. सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख