अधिकारी क्वारंटाईन प्रकरणी नितीश कुमारांनी व्यक्त केली नाराजी - Bihar Cm Nitish Kumar Unhappy over IPS Officer Quarantine Issue | Politics Marathi News - Sarkarnama

अधिकारी क्वारंटाईन प्रकरणी नितीश कुमारांनी व्यक्त केली नाराजी

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

दरम्यान, विनय तिवारी यांना 'होम क्वारंटाईन' करण्यात आले नसून प्रत्यक्षात ही 'हाऊस अरेस्ट' असल्याची प्रतिक्रिया बिहार पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत बिहारच्या पोलिस महासंचालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून त्यानंतर याबाबतची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे

पाटणा : बिहारचे आयपीएस अधिकारी पाटण्याचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन केल्या प्रकरणात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिवारी यांना मुंबई महापालिकेने होम क्वारंटाईन केले आहे. 

"विनय तिवारी यांच्याबाबत मुंबईत जे काही घडले ते योग्य नाही. बिहार पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत. यात कुठलेही राजकारण नाही,'' अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. आमचे पोलिस महासंचालक मुंबई पोलिसांशी याबाबत बोलणे करतील, असेही नितीश कुमार यांनी सांगितले आहे. ''या आधी चार पोलिस अधिकारी मुंबईत पोहोचले आहेत. ते देखिल पाटण्याहून मुंबईला विमानानेच गेले होते. पण त्यांना क्वारंटाईन करण्यात आले नाही. आम्ही सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आयपीएस अधिकाऱ्याला मुंबईला पाठवले. या अधिकाऱ्याने तपासाला सुरुवात करताच त्याला क्वारंटाईनमध्ये टाकण्यात आले,'' अशी प्रतिक्रिया बिहारचे मंत्री संजय झा यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, विनय तिवारी यांना 'होम क्वारंटाईन' करण्यात आले नसून प्रत्यक्षात ही 'हाऊस अरेस्ट' असल्याची प्रतिक्रिया बिहार पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत बिहारच्या पोलिस महासंचालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून त्यानंतर याबाबतची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पाटण्याहून मुंबईला आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी असलेल्या नियमांनुसारच क्वारंटाईन करण्यात आल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे. क्वारंटाईनमधून सुट मिळण्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेच्या सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज करावा, असेही सांगण्यात आले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख