baloch liberation army claims responsibility of pakistan stock exchange attack | Sarkarnama

पाकिस्तानी शेअर बाजारावरील हल्ल्यामागे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जून 2020

पाकिस्तान शेअर बाजारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान हादरले आहे. दहशतवाद्यांनी थेट शेअर बाजारच लक्ष्य केल्याने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

कराची : पाकिस्तान शेअर बाजारावर आज सकाळी चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात चार दहशतवाद्यांसह चार सुरक्षारक्षक आणि एक पोलिस अधिकारी ठार झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. त्यामुळे बलुचिस्तान फुटिरतावादी चळवळीतील ही संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

मशिन गन आणि ग्रेनेडसह आज सकाळी पाकिस्तान शेअर बाजारावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. पार्किंगमधून हल्ला करुन त्यांनी संपूर्ण इमारतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा दलांनी याला प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना ठार केले होते. आता या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान फुटिरतावादी चळवळीतील सशस्त्र संघटना असलेल्या बलुच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. स्वतंत्र्य बलुचसाठी लढा देणारे नेते उघडपणे या संघटनेला पाठिंबा देत नसले तरी ते संघटनेविषयी सहानुभूती असणारे आहेत. 

बलुच लिबरेशन आर्मीचे सुमारे 6 हजार सदस्य आहेत. ते पाकिस्तान सरकारविरोधात 2000 सालापासून लढत आहेत. आतापर्यंत देशभरात त्यांनी अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेनेही या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. ही संघटना प्रामुख्याने बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमाभागात कार्यरत आहे. बलुचिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांमध्ये ही सर्वांत जुनी संघटना आहे. संघटनेतील सदस्य हे प्रामुख्याने मारी आणि बुग्ती या आदिवासी समूहांतील आहेत. 

बलुच लिबरेशन आर्मीला पाकिस्तानपासून बलुचिस्तान वेगळा करावयाचा आहे. पाकिस्ता न सरकार केवळ बलुचीस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करीत आहे. मात्र, त्याचा कोणताही फायदा तेथील जनतेला होत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. पाकिस्तानच्या सैन्य तळावर आणि सैन्यातील अधिकाऱ्यांवर संघटनेने अनेक वेळा हल्ले केले आहेत. याचबरोबर देशात अनेक ठिकाणी झालेल्या बाँबस्फोटातही संघटनेचा हात आहे. 

चीनला विरोध करण्याचीही भूमिका 

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बलुचिस्तानमधून जात आहे. याला संघटनेचा विरोध आहे. यामुळे संघटनेने 2004 मध्ये चिनी कामगारांवर हल्ले करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने अतिरिक्त 20 हजार सैनिक बलुचिस्तानात तैनात केले होते. याचबरोबर चिनी पायाभूत सुविधा आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर हल्लेही संघटनेने केले आहेत. याचबरोबर 2018 मध्ये संघटनेने कराचीतील पाकिस्तानी दूतावासावर गोळीबार केला होता. यात चार जण ठार झाले होते. संघटनेने आपली चीनविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख