#SSRSuicide : सीबीआयकडे तपास देणार नाही; गृहमंत्री देशमुखांची ठाम भूमिका

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले. घराणेशाहीसह इतर मुद्दे समोर आले असून, यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आता सुशांतच्या वडिलांच्या एफआयआरमुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.
anil deshmukh says sushant singh rajput case will not be transferred to cbi
anil deshmukh says sushant singh rajput case will not be transferred to cbi

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये वादळ उठले आहे. सुशांतच्या आत्महत्येची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचवेळी गृहमंत्री अनिल देशमुख हे मुंबई पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत.   

सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  

सुशांतवर उपचार करणारे मानसोपचारतज्ञ डॉ.केर्सी चावडा यांचाही जबाब पोलिसांनी नोंदविला होता. सुशांतवरील वैद्यकीय उपचाराबाबत माहिती घेण्यासाठी ही चौकशी करण्यात आली होती. त्याची मानसिक स्थिती आणि औषधोपचार याचीही माहिती घेण्यात आली होती. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करावा, अशी मागणी रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची शक्यता फेटाळून लावली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. यामुळे गृहमंत्री देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यास पुन्हा एकदा नकार देण्याची भूमिका घेतली. याचबरोबर तपास महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत, असे म्हणून ते पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकताच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंदविला आहे. याचबरोबर धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला असून, सुशांतने धर्मा प्रॉडक्शनसोबत शेवटी केलेल्या ड्राईव्ह या चित्रपटाच्या कराराची प्रतही त्यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी यशराज फिल्म्सचे (वायआरएफ) आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही पोलिसांनी नुकतीच चौकशी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा मॅरेथॉन तपास सुरू आहे. आगामी काळात आणखी काही जणांचे जबाब नोंदविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com