बंगालच्या निवडणुकीची सूत्रे अमित शहाच हाती घेणार - Amit Shah to take rains of West Bengal Election campaign | Politics Marathi News - Sarkarnama

बंगालच्या निवडणुकीची सूत्रे अमित शहाच हाती घेणार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

राज्यपाल जगदीश धनखड यांनी दिल्लीत अमित शहा यांच्याशी नुकतीच चर्चा केली होती. राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे मत त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडले. पश्‍चिम बंगालचे आव्हान बिहारपेक्षा कितीतरी जास्त व हिंसक असल्याचे लक्षात आल्याने भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने नड्डा यांच्याएवजी यावेळी स्वतः शहा यांनाच त्या राज्याचा दौरा करण्यास सांगितल्याचे समजते. 

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सूत्रे गृहमंत्री अमित शहा हे स्वतःच्या हाती घेणार आहेत. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचा पुढील आठवड्यातील बंगाल दौरा रद्द करण्यात आला असून त्याऐवजी स्वतः शहा त्या राज्यात जाऊन भाजपच्या निवडणूक तयारीबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील असे सूत्रांनी सांगितले. मार्चमधील कोरोना लॉकडाऊननंतर शहा बहुधा पहिल्यांदाच दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीबाहेर जात आहेत.

बंगालमध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजपने सारा जोर लावला आहे. त्यासाठी शहा 5 नोव्हेंबरला दोन दिवसीय दौऱ्यावर बंगालमध्ये जाणार आहेत. १ मार्चला ते याआधी बंगालला गेले होते. नड्डा हे निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठीच जाणार होते तथापि त्यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. शहा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिहार निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय भाग घेतलेला नाही. त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आल्याचे बोलले जात असले तरी त्यांच्या गाठीभेटी व बैठकांचा प्रघात पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. 

राज्यपाल जगदीश धनखड यांनी दिल्लीत शहा यांच्याशी नुकतीच चर्चा केली होती. राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे मत त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडले. पश्‍चिम बंगालचे आव्हान बिहारपेक्षा कितीतरी जास्त व हिंसक असल्याचे लक्षात आल्याने भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने नड्डा यांच्याएवजी यावेळी स्वतः शहा यांनाच त्या राज्याचा दौरा करण्यास सांगितल्याचे समजते. 

शहा ५ नोव्हेंबरला मेदिनीपूरचा दौरा करतील. त्यांचे सारे कार्यक्रम बंद दालनांत-सभागृहांतच होणार आहेत. ६ नोव्हेंबरला ते कोलकत्यामध्ये राज्यातील वरिष्ठ पक्षनेत्यांबरोबरच्या बैठकीत भाजपची संघटनात्मक तयारी, बूथपातळीवरील निवडणुक पूर्वतयारी आदींचा आढावा घेतील. भाजपचे बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय, उपाध्यक्ष मुकुल रॉय, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आदी नेत्यांबरोबर चर्चा करतील. त्यानंतर त्यांची एखादी पत्रकार परिषदही होण्याची शक्‍यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख