गँगस्टर विकास दुबेमुळे आता संपूर्ण चौबेपूर पोलीस ठाणेच रडारवर

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये झालेल्या चकमकीनंतर राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे अखेर पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
all personnal at chaubepur police station under investigation in connection with vikas dubey
all personnal at chaubepur police station under investigation in connection with vikas dubey

कानपूर : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये 2 जुलैला झालेल्या गुंडांसोबत झालेल्या चकमकीत आठ पोलीस ठार झाले होते. गँगस्टर विकास दुबे याला पकडण्यासाठी पोलीस गेल्यानंतर ही चकमक घडली होती. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर खडबडून जागे झालेले राज्य सरकार वेगाने पावले उचलू लागले आहे. या चकमकीवेळी जाणीवपूर्वक कानाडोळा करणाऱ्या चौबेपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आले होते. आता या पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी पोलीस खात्याच्या रडारवर आले आहेत. 

कानपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मोहित अगरवाल यांनी चौबेपूर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सध्या निगरानीखाली ठेवले आहेत. यामुळे पोलीस लाईनमधून तातडीने दहा पोलीस कॉन्स्टेबलची चौबेपूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. याआधी चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विनय तिवारी यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दुबेच्या कनेक्शनमधील तीन पोलीस अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले होते. पोलीस ठाण्यातील सर्वच जण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  

चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरु गावात ही चकमक घडली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत संशयाची सुई विनय तिवारी यांच्याकडे वळत होती. त्यांचे विकास दुबे याच्याशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस या आरोपांची शहानिशा करीत आहेत. तिवारी अथवा इतर कोणत्या पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचा दुबेशी संबंध असल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यासोबत त्यांना तुरुंगात पाठविण्यात येईल. 

विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना 2 जुलैला रात्री घडली होती. यात आठ पोलीस ठार झाले असून, विकास दुबे हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांचे सरकार उत्तर प्रदेशात असताना एका मंत्र्यांची हत्या केल्याचाही आरोप दुबे याच्यावर आहे. उत्तर प्रदेशात त्याच्यावर तब्बल 60 गुन्हे दाखल आहेत. 

विकास दुबे याने 2001 मध्ये पोलीस ठाण्यात घुसून राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. या हत्येमुळे तो उत्तर प्रदेशसह राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला होता. त्याने 2000 मध्ये कानपूरमधील ताराचंद इंटर कॉलेजच्या सहाय्यक व्यवस्थापकाचा खून केला होता. त्याचवर्षी कानपूर कारागृहात असतानाच त्याने रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट आखला होता. नंतर 2004 मध्ये केबल व्यावसायिक दिनेश दुबे खून प्रकरणातही त्याचा समावेश होता. दुबेने 2018 मध्ये त्याच्या चुलतभावावरच खुनी हल्ला करवून आणला होता. 

विकास दुबेने 2002 मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावल्या होत्या. त्यामुळे कानपूर शहरासह बिलहार, शिवराजपूर, रिनयान आणि चौबेपूर या भागात त्याची दहशत आहे. काल झालेली चकमक ही चौबेपूर भागातच झाली होती. येथेच दुबे आणि त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांना ठार केले. दुबे याचे अनेक राजकीय पक्षांशी जवळचे संबंध आहेत. शिवराजपूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत कारागृहातून निवडून येण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंद आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com