अखिलेश अखेर नरमले; काकांशी जुळवून घेतले - Akhilesh Yadav Vacated Constituency for Shivpal Yadav | Politics Marathi News - Sarkarnama

अखिलेश अखेर नरमले; काकांशी जुळवून घेतले

वृत्तसंस्था
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष (सप) कोणत्याही मोठ्या पक्षाबरोबर युती करणार नाही, असा निर्णय माजी मुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी जाहीर केला. काका शिवपाल यादव यांच्या ‘घरवापसी’चे सूतोवाचही त्यांनी केले.

इटावा : उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष (सप) कोणत्याही मोठ्या पक्षाबरोबर युती करणार नाही, असा निर्णय माजी मुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी जाहीर केला. काका शिवपाल यादव यांच्या ‘घरवापसी’चे सूतोवाचही त्यांनी केले.

दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना अखिलेश यादव यांनी २०२२ मधील विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून हा मोठी घोषणा केली. मोठ्या पक्षांशी युती न करता छोट्या पक्षांना बरोबर घेऊन‘सप’ ही निवडणूक लढेल, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत शिवपाल यादव यांच्यासाठी इटावामधील जसवंतनगरचा मतदारसंघ ‘सप’ सोडेले. एवढेच नाही तर पक्षाचे सरकार आल्यावर त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल. पत्रकार परिषदेत बहुजन समाज पक्षाचे तीन माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कीरतसिंह पाल यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी समाजवादी पक्षाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

काकांसाठी सोडला मतदारसंघ
अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडून प्रगतिशील समाजवादी पक्षाची (प्रसप) स्थापना केलेली आहे. प्रस्तावित विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांबरोबर आघाडी करण्याच्या निर्णयानंतर ‘प्रसप’बद्दल विचारले असता त्यांच्या पक्षालाही सामावून घेण्यात येईल, असे सांगितले. त्यांच्यासाठी जसवंतनगरची जागा सोडल्याचेही ते म्हणाले.

भाजपची बेईमानी
बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल ज्या पद्धतीने जाहीर झाला आहे, त्यानंतर २०२२मध्ये ‘सप’ची रणनीती काय आहे, असे विचारले असता अखिलेश म्हणाले की, रणनीती जाहीर करणार नाही. नाही तर त्यांना ते समजेल. लोकशाहीत एवढा मोठा विश्वासघात कोणी केला नसेल, जेवढा भाजपने बिहारमधील जनतेसोबत केला आहे. महाआघाडीला त्यांनी बेईमानीने हरविले आहे.

सरकारी अधिकारी दावणीला
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्या विषयी बोलताना ‘भाजप नाही तर सरकारचे सर्व अधिकारीच जेथे जेव्हा निवडणूक लढत असतील तर कोण निवडून येणार.’ असा प्रश्‍न अखिलेश यादव यांनी केला. २०२२मधील निवडणुकीत विकासकामांच्या आणि भाजप सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ‘सप’ जनतेसमोर जाईल, असे त्यांनी सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख