अखिल भारतीय संत समितीने उद्धव ठाकरेंना ठरवले नालायक... - akhil bharatiya sant samiti targets maharashtra chief minister uddhav thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

अखिल भारतीय संत समितीने उद्धव ठाकरेंना ठरवले नालायक...

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचा मुहूर्त निघाला असून, 5 ऑगस्टला भूमिपूजन होणार आहे. मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावरुन आता वाद सुरू झाला आहे. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  ५ ऑगस्टला होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावा, अशी सूचना केली होती. आता यावरुन अखिल भारतीय संत समितीने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.  

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची यादी अद्याप अंतिम झालेली नाही. 

या कार्यक्रमाचे निमंत्रण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना मिळाले आहे. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना मात्र, निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. अडवानी, जोशी आणि उमा भारती हे सर्वजण बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आरोपी आहेत. 

अडवानी आणि जोशी यांनाच राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमातून डावलल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. याचबरोबर भाजपमध्येही याबद्दल नाराजीचा सूर होता. अखेर अडवानी आणि जोशी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावतील, असे सांगण्यात आले आहे. अडवानी आणि जोशी यांची अशा प्रकारे व्हर्च्युअल उपस्थिती कार्यक्रमाला असेल. 

अखिल भारतीय संत समिती ही हिंदू साधू आणि संतांची सर्वोच्च संस्था आहे. समितीने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. समितीचे सरचिटणीस जितेंद्रानंद सरस्वती यांनी उद्धव ठाकरे यांना नालायक म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बापाच्या वारशावर नालायक मुलगा बसला आहे. त्यांना धर्म आणि अध्यात्माची भाषाही राजकारणाची वाटते हे दुखद आहे. ते आता इटालियन बटालियनमध्ये बसल्याने असे बोलत आहेत. इटालियन बटालियनमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीकडून दुसरी काय अपेक्षा आपण करणार आहोत. 

याचवेळी सरस्वती यांनी शिवसेनेचे प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, उद्धव यांचे पिता खूप मोठे होते. त्यांनी कायम राम मंदिराला पाठिंबा दिला होता. परंतु, उद्धव हे मिशनरी शाळेत शिकल्याने त्यांना प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल यातील फरक लक्षात येणार नाही. भूमिपूजन हे भूमीला स्पर्श केल्याशिवाय होऊ शकत नाही. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख