जयललिता यांना हवी होती अयोध्येत राम मंदिरासोबत मशिदही..! - aiadmk supermo jayalalithaa wanted ram mandir and mosque in ayodhya | Politics Marathi News - Sarkarnama

जयललिता यांना हवी होती अयोध्येत राम मंदिरासोबत मशिदही..!

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन आज होत आहे. याची जोरदार तयारी अयोध्येत सुरू असून, कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  आज होत आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत जोरदार लगबग सुरू झाली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या असून, अण्णाद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा दिवंगत जयललिता यांना अयोध्येत राम मंदिरासोबत मशिदही हवी होता, असा दावा केला आहे. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल.  

मागील वर्षी 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील जागा राम मंदिराच्या उभारणीसाठी द्यावी, असा आदेश केंद्र सरकारला दिला होता. त्यानंतर या वर्षी 5 फेब्रुवारीला अयोध्येत मंदिराचे बांधकाम करण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आल्याची घोषणा 5 फेब्रुवारीला करण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर हे ट्रस्ट देखरेख ठेवणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या कार्यक्रमात मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत असणार आहेत. भागवत हे आज सायंकाळी अयोध्येत दाखल झाले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अडवानी यांना डावलून भागवत यांना स्थान दिल्याने भाजपमध्येही नाराजीचा सूर आहे. मोदी आणि भागवत यांच्यासह मंचावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास उपस्थित असतील. 

तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वानी यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या बैठकीत 23 नोव्हेंबर 1992 मध्ये जयललिता यांनी अयोध्येत राम मंदिर बांधावे, अशी आग्रही मागणी केली होती. त्याचवेळी अयोध्येत मशिदही बांधली जावी, असेही त्या म्हणाल्या होत्या. देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सलोखा राखून एकात्मता वाढीसाठी हे आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तातडीने पावले उचलून राम मंदिराचे काम हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे लागेल. तमिळनाडूतील सर्व जनतेच्या अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला शुभेच्छा आहेत, असे पलानीस्वामी यांनी नमूद केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख