राम मंदिरासाठी देशभर रान उठविणारे अडवाणी उद्या अयोध्येला जाणार नाहीत ! !  - Advani, who is campaigning for Ram temple across the country, will not go to Ayodhya tomorrow! | Politics Marathi News - Sarkarnama

राम मंदिरासाठी देशभर रान उठविणारे अडवाणी उद्या अयोध्येला जाणार नाहीत ! ! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

अयोध्येत उद्या दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल.

नवी दिल्ली : अयोध्येत उद्या (5ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इकबाल अन्सारी उपस्थित राहणार आहेत.

अन्सारी हे सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीकडून पक्षकार होते. त्यांना मंदिर न्यासाकडून निमंत्रण देण्यात आले आहे. 

मात्र ज्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून देशभर रान उठविले असे पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याणसिंह हे नेते उपस्थित राहणार नसल्याचे समजते. 

भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी जेव्हा अयोध्येत येतील तेव्हा इकबाल अन्सारी हे मोदींचे स्वागत करणार आहेत. त्यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रमास कोरोनामुळे उपस्थित राहायचे की नाही याबाबत विचार सुरू होता मात्र साधुसंताच्या आग्रहामुळे मोदी यांनी शेवटी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्या मोदी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला जात आहेत. 

देशातील कोरोनाचे संकट पाहता खास निमंत्रितांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाणार होते. मात्र ते ही जाणार नाहीत. ठाकरे अयोध्येला जाणारच असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते, मात्र ठाकरेच कशाला सर्वच मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले पाहिजे असा सूरही निघाला होता. काही असले तरी उद्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून भव्यदिव्य मंदिराची उभारणी होणार आहे. 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमी खबरदारीही घेण्यात आली असून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे ही उपस्थित राहणार नसल्याचे कळते. मात्र विश्व हिंदू परिषदेचे नेते दिवंगत नेते अशोक सिंघल यांच्या नातेवाईकांना मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिर भूमिपुजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभर एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे. 

अयोध्येत उद्या दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. पंतप्रधान येणार असल्याने अयोध्या नगरी सील करण्यात आली असून मोदींसोबत केवळ 175 लोकच तेथे उपस्थित राहाणार आहेत. त्यामध्ये काही साधुसंताचाही समावेश आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख