ब्रेकिंग : अटकेच्या शक्यतेने रिया चक्रवर्तीची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले. घराणेशाहीसह इतर मुद्दे समोर आले असून, यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आता सुशांतच्या वडिलांच्या एफआयआरमुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.
actress rhea chakraborty will file for anticipatory bail in sushant singh rajput suicide case
actress rhea chakraborty will file for anticipatory bail in sushant singh rajput suicide case

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या धक्क्यातून बॉलीवूड अद्याप सावरलेले नाही. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये वादळ उठले आहे. सुशांतच्या आत्महत्येची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी रिया हिला अटक होण्याची शक्यता आहे.  

याचवेळी सुशांतचे पिता के.के. सिंह यांनी मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. यामुळेच त्यांनी अखेर बिहारमध्येच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. के.के.सिंह यांनी बिहारमधील पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सुशांतला २०१९ मध्ये कोणाताही मानसिक विकार नव्हता. रियाच्या संपर्कात तो आल्यानंतर त्याला मानसिक विकार जडले. त्याच्यावरील मानसिक उपचारासाठी कुटुंबीयांपैकी कोणाचीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या सर्व प्रकरणात त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही सहभागी असावेत. त्यांनी माझ्या मुलाला कोणती औषधे दिली याची चौकशी व्हावी. 

माझ्या मुलाच्या खात्यात १७ कोटी होते. यातील १५ कोटी रुपये त्याच्याशी निगडित नसलेल्या व्यक्तींच्या खात्यात वर्ग झाल्याचे बँक स्टेटमेंटमधून समोर आले आहे. रियाने तिच्या कुटुंबीयांना यातील किती पैसे दिले याची चौकशी व्हावी. सुशांतला आधी चांगले चित्रपट मिळत होते. रिया त्याच्या जीवनात आल्यानंतर त्याला चित्रपट मिळणे बंद झाले. याचीही चौकशी करण्याची गरज आहे. रियाने त्याच्यावरील मानसिक उपचार जगजाहीर करण्याची धमकी दिली होती. रिया आणि तिचे नातेवाईक माझेही सुशांतशी बोलणेही होऊ देत नव्हते. रिया आणि तिच्या नातेवाईकांनी षडयंत्र करुन माझ्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे के.के.सिंह यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे. यामुळे बिहार पोलिसांनी सुशांतच्या व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रिया हिला अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे रिया हिने अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरू केली आहे. काल रात्री रिया हिने वकील सतिश मानेशिंदे यांच्याशी अटकपूर्व जामिनाबाबत चर्चा केली आहे. याचबरोबर रियाच्या वकील आनंदिनी फर्नांडिस याही काल रियाच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कायदेशीर बाबींबाबत चर्चा केली आहे. सुमारे तीन तास चर्चा केल्यानंतर फर्नांडिस या रियाच्या घरातून बाहेर पडताना दिसल्या होत्या. आज रिया अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करु शकते.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकताच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंदविला आहे. आज धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे. सुशांतने धर्मा प्रॉडक्शनसोबत शेवटी केलेल्या ड्राईव्ह या चित्रपटाच्या कराराची प्रतही मेहता यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी यशराज फिल्म्सचे (वायआरएफ) आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही पोलिसांनी नुकतीच चौकशी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा मॅरेथॉन तपास सुरू आहे. आगामी काळात आणखी काही जणांचे जबाब नोंदविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. यामुळे याआधी यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. शानू यांनी अभिनेता रणवीरसिंह, अर्जुन कपूर, वाणी कपूर यांना चित्रपटसृष्टीत पदार्पणाची संधी दिली होती. सुशांत याच्यासोबत त्यांनी यश राज फिल्म्सच्या शुद्ध देसी रोमान्स आणि डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटांसाठी काम केले होते. 

सुशांतवर उपचार करणारे मानसोपचारतज्ञ डॉ.केर्सी चावडा यांचाही जबाब पोलिसांनी नोंदविला होता. सुशांतवरील वैद्यकीय उपचाराबाबत माहिती घेण्यासाठी ही चौकशी करण्यात आली होती. त्याची मानसिक स्थिती आणि औषधोपचार याचीही माहिती घेण्यात आली होती. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करावा, अशी मागणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची शक्यता फेटाळून लावली होती.

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com