अभिनेता दिनो मोरिया म्हणतो, माझ्या घरी पार्टीच झाली नाही... - actor dino morea clarifies about allegation against him in sushant singh rajput case | Politics Marathi News - Sarkarnama

अभिनेता दिनो मोरिया म्हणतो, माझ्या घरी पार्टीच झाली नाही...

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र विरुद्ध बिहार सरकार संघर्ष सुरू आहे. या प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये जुंपली आहे. आता अभिनेता दिनो मोरिया याने या प्रकरणी अखेर खुलासा केला आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

अभिनेता दिनो मोरिया याच्या घरी 13 जूनला पार्टी आयोजित करण्यात आली होती. याला सुशांतही उपस्थित होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुशांतने आत्महत्या केली, असा आरोप होत आहे. यावर दिनो मोरिया याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने ट्विटरवर म्हटले आहे की, माझ्या घरी अशाप्रकारची कोणतीही पार्टी झालेली नाही. तुम्ही माझ्यावर आरोप करण्याआधी तथ्ये तपासून घ्या. विनाकारण माझे नाव या प्रकरणात ओढू नका. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख