....तर मोदींच्या प्रतिमेला धक्का बसेल! शिवसेनेने दिला इशारा

भारत व चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी धुमश्चक्री झाली. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले याबद्दल 'सामना'च्या अग्रलेखात संताप व्यक्त करण्यात आला आहे.२० जवानांच्या हौतात्म्यानंतरही देशाचे पंतप्रधान काय झाले ते सांगण्यासाठी जनतेसमोर येऊ नयेत, हे धक्कादायक आहे, असेही 'सामना' ने म्हटले आहे.
Shivsena Warns Pm Narendra Modi Over China Issue
Shivsena Warns Pm Narendra Modi Over China Issue

पुणे : लडाखमधल्या भारतीय हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे. दिल्लीत बैठका आणि चर्चा सुरू आहेत. सध्याच्या काळात तणाव परवडणारा नाही. मात्र तरीही २० जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय?, असा प्रश्न उपस्थित करत प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का बसेल, असा इशारा शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'मधून दिला आहे.

भारत व चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी धुमश्चक्री झाली. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले याबद्दल 'सामना'च्या अग्रलेखात संताप व्यक्त करण्यात आला आहे. ''दोन देश सीमेवर मिळेल त्या हत्याराने लढत आहेत. डोकी फोडत आहेत. कोथळे काढत आहेत. सीमेवर रक्ताचे सडे पडत आहेत. भारत-चीन सीमेवर हा संघर्ष व चढाया पन्नास वर्षांनंतर सुरू झाल्या व २० जवानांच्या हौतात्म्यानंतरही देशाचे पंतप्रधान काय झाले ते सांगण्यासाठी जनतेसमोर येऊ नयेत, हे धक्कादायक आहे," अशी टिका या अग्रलेखात करण्यात आली आहे. 

गलवान खोऱ्यात नक्की काय घडले

सोमवारी रात्री दोन देशांच्या सैनिकांमध्ये सोमवारी रात्री धुमश्चक्री झाली व त्यात आपले वीस जवान शहीद झाल्याचे अधिकृतरित्या सांगायला बुधवार उजाडला आहे, याकडेही या अग्रलेखात लक्ष वेधण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'या जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. आम्हाला डिवचलं तर जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत,' असा इशारा चीनला दिला आहे ते योग्य असले तरी गलवान खोऱ्यात नक्की काय झाले हे अद्याप जनतेला सांगण्यात आलेले नाही, ही वस्तुस्थितीही अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. चीनचे सैनिकही मारले गेले यावर खूष होऊन आपण टाळ्या वाजवायच्या काय, असा खोचक सवालही शिवसेनेने विचारला आहे. 

..आणि राज्यकर्ते जग जिंकायला निघालेत

''मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश अधिक मजबूत, खंबीर व लढाऊ बाण्याचा झाल्याचे दावे सहा वर्षांत अनेकदा करण्यात आले आहेत. पण याच काळात पाकिस्तान, नेपाळ व आता चीनने भारतावर सरळ हल्ला केला आहे. भारताच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत व आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचे आश्चर्य वाटते,'' असा टोमणा शिवसेनेने लगावला आहे. 

बलिदाने थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच

''पाकिस्तानची मस्ती सर्जिकल स्ट्राईकनंतरही गेलेली नाही. चीन हा फसवा आणि मायावी देश आहे. पण जर नेपाळसारखा देश भारताकडे वाकड्या नजरेने पहात असेल तर जगाचा नेता, महासत्ता वगैरे होऊ पाहणाऱ्या आपल्या देशाची अवस्था बरी नाही हे मानावे लागेल. कोरोनाच्या प्रसारावरुन अमेरिका व चीन यांच्यात भांडण लागले. पण अमेरिका चिनी क्षेपणास्त्रांच्या टप्प्याबाहेर आहे. चीन आपल्या सीमेवरचे राष्ट्र आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांनी धगधगत्या सीमा शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तो यासाठीच. कारण अशा संघर्षाची किंमत फार मोठी असते. चीन बरोबरच्या संघर्षाचे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात असल्याचे जाहीर सभांमध्ये सांगून टाळ्या मिळतील, पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे,'' अशी जाणीव या अग्रलेखाद्वारे सरकारला करुन देण्यात आली आहे. 

गडबड सीमेवर नव्हे तर दिल्लीत

''दिल्लीतली सरकारे नामर्द आहेत असे सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या जोरकसपणे सांगत होते. आज तेच सत्ताधीश आहेत. त्यामुळे जे काही घडले आहे त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी अहमदाबादला येऊन मोदींबरोबर झोपाळ्यावर बसून ढोकळा खाल्ला तेव्हाही आम्ही हाच इशारा दिली होता की चिनी लाल माकडांवर विश्वास ठेऊ नका. पंडित नेहरुंचा जसा झाला तसा तुमचाही विश्वासघात होईल. आणि दुर्दैवाने तो झाला,'' असेही या अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तान हा देश नसून टोळी आहे. पण चीन ची स्वतःची जागतिक फळी आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक, धमक्या आणि इशारे यांचा परिणाम चीनवर होणार नाही, असा इशारा या अग्रलेखातून देण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com