'फॅबिफ्ल्यु' बद्दल खासदार  अमोल कोल्हेंचे आहेत आक्षेप

फॅबिफ्ल्यु हे औषध कोरोनाच्या रुग्णांना बरं करेल, असे 'ग्लेनमार्क' या औषध कंपनीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी काही आक्षेप नोंदवले आहेत
NCP MP Amol Kolhe Raises Objections about FabiFlue
NCP MP Amol Kolhe Raises Objections about FabiFlue

पुणे : कोविड १९ च्या रुग्णांना बरे करण्याचा दावा 'ग्लेनमार्क' या कंपनीने केला आहे. या कंपनीच्या 'फॅबिफ्ल्यु' या औषधाच्या चाचण्या, त्यांची परिणामकारकता आणि किंमत याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही आक्षेप उपस्थित केले आहेत. 

अर्धवट माहिती मीडियातून सादर करून लाखो नागरिकांची दिशाभूल होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.  

फॅबिफ्ल्यु हे औषध कोरोनाच्या रुग्णांना बरं करेल, असे 'ग्लेनमार्क' या औषध कंपनीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यासाठी 'ग्लेनमार्क'ने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचाही (आयसीएमआर) दाखला दिला आहे. तसेच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डिसीजीआय) या औषधाचा रुग्णांसाठी वापर करण्यास परवानगी दिली आहे, असेही सांगण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार 'फॅबिफ्ल्यु' या एका गोळीची किंमत १०३ रुपये आहे. यावर कोल्हे यांनी आक्षेप नोंदवला आहे.

डाॅ. हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात "कंपनीच्या दाव्यानुसार कोरोनाच्या रुग्णांना १४ दिवस या गोळ्या घ्याव्या लागतील. म्हणजे १४ दिवसांत १२२ गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. यासाठी सुमारे बारा हजार पाचशे रुपयांचा खर्च करावा लागेल. हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. कोरोनासारख्या  जागतिक महामारीत दररोज रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीयांना कमीत कमी किमतीत उपचार उपलब्ध द्यायला हवेत. 'फॅबिफ्ल्यु'ची चाचणी तातडीने महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णांवर करण्यात आली आहे. असे असूनही त्या सर्वसामान्य रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार औषधाची किंमत ठरवताना केलेला दिसत नाही." 

औषध सामान्यांना परवडणार हवे

हे नवीन औषध सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत आणि मुबलक उपलब्ध करून देण्याची विनंती कोल्हे यांनी आरोग्य मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून  केली आहे.  '

ग्लेनमार्क'ने केलेल्या दाव्यानुसार 'फॅबिफ्ल्यु' हे एकमेब कोरोनावर औषध आहे, या दाव्यातही तथ्य नाही, असे कोल्हे यांनी नमूद केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात दिलेल्या माहितीनुसार 'फॅबिफ्ल्यु'च्या चाचण्यांबद्दल क्लिनिकल ट्रायल्स रजिस्ट्री - इंडियाच्या (सीटीआरआय) संकेतस्थळावर जी माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार एप्रिल व मे महिन्यात कोरोनाच्या सौम्य लक्षणे असलेल्या ९० आणि मध्यम लक्षणे असलेल्या ६० रुग्णांवर चाचण्या करण्यात आल्या. परंतु, त्यासाठी केवळ 'फॅबिफ्ल्यु' व्यतिरिक्त अन्य औषधांचाही वापर झाला आहे. 

कोल्हे आपल्या पत्रात पुढे म्हणतात, "कोरोनाच्या उपचारांदरम्यान प्रकृती स्थिर असलेल्या आणि दोन सौम्य लक्षणे आणि चार मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवरच ही चाचणी झाली आहे. ज्या रुग्णांमध्ये प्राणवायूची पातळी ९४ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यांना या चाचणीतून वगळण्यात आल्याची नोंद 'सीटीआरआय'च्या संकेतस्थळावर आहे. तसेच रक्तदाब, मधुमेह आदी प्रकारचे आजार असलेल्या रुग्णांवर 'फॅबिफ्ल्यु' चाचणीचा परिणाम काय झाला आहे, याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही, तसेच कोरोनामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांवर 'फॅबिफ्ल्यु'चा काय परिणाम झाला आहे, हे देखील स्पष्ट झालेले नाही,'' 

अर्धवट माहितीतून दिशाभूल होण्याची शक्यता

त्यामुळे कंपनीने माध्यमांमधून दिलेल्या अर्धवट माहितीमुळे नागरिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींची दिशाभूल होण्याची दाट शक्यता आहे, असे कोल्हे यांचे म्हणणे आहे. या औषधाचा सर्रास वापर झाल्यास सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर आणि नागरिकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीवर विपरित परिणाम होईल, अशी भीतीही डॉ. कोल्हे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. 

चर्चा घडवून आणावी

'ग्लेनमार्क'चा 'फॅबिफ्ल्यु'बाबतच्या दाव्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीने पावले उचलावीत आणि व त्यावर निर्बंध आणावेत, असे कोल्हे यांनी म्हटले आहे. तसेच 'डिसीजीआय', आयसीएमआरमार्फत या विषयावर जाहीर चर्चा घडवून आणावी, अशीही विनंती डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com