Manoj Tiwari was locked down, the last stick on the camel's back! | Sarkarnama

मनोज तिवारींना लॉकडाऊन ठरले उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ! 

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 2 जून 2020

कोरोना लॉकडाऊनती ऐशीतैशी करून तिवारी यांनी हरियाणात क्रिकेट खेळणे, आप सरकारविरूद्ध आंदोलन करणे असे प्रकार केले. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन लावणाऱया वरिष्ठ भाजप नेतृत्वाच्या रोषाचे ते धनी ठरले. 

नवी दिल्ली : राजकीयदृषट्या देशाचे नाक समजल्या जाणाऱ्या राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाने मोठे ऑपरेशन केले असून प्रदेशाध्यक्ष, खासदार मनोज तिवारी यांची हकालपट्टी करून आदेशकुमार गुप्ता या नव्या चेहऱयाच्या हाती दिल्लीचे प्रदेशाध्यक्षपद सोपविले आहे. 

कोरोना लॉकडाऊन तोडून तिवारी यांनी केलेले प्रकार, ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली असावी, असे निरीक्षण एका वरिषठ पक्षनेत्याने नोंदविले. 

छत्तीसगड (विष्णुदेव साय) व मणिपुर (टिकेंद्र सिंह) येथील प्रदेशाधयक्षपदांवरही नव्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. 2019 मध्ये अमित शहा गृहमंत्री झाल्यावर पक्षाच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने जे पी नड्डा यांना भाजपच्या राट्‌ष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त केले. त्यांच्याच हातून दिल्लीतील अवघड वाटणारा हा खांदेपालट भाजप नेतृत्वाने तडीस नेला आहे. 

तिवारी यांची 2016 मधये दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी भाजपने नियुक्ती केली होती. ते भोजपुरी गायक-अभिनेते आहेत. त्यामुळे पूर्व-दक्षिण दिल्लीतील प्रचंड मोठ्या संख्येने असणाऱ्या पूर्वांचली मतदारांवर प्रभाव पडेल असे भाजप नेतृत्वाचे मत होते. ते तर चुकीचे ठरलेच आणि दिल्लीत सलग दुसऱ्या वेळेस सर्वशक्तीमान नेतृत्वाखालील भाजपला आम आदमी पक्षाने चारी मुंड्या चीत केले. 

हा पराभव भाजप नेतृत्वाच्या जिव्हारी लागला पण लगेचच तिवारी यांची हकालपट्टी करण्याचे भाजपने टाळले. तिवारी यांचे दिल्ली भाजपच्या नेत्यांशी कधीही पटले नाही. त्यांची राजकीय स्टंट करण्याची व विनाकारण वाद वाढविण्याची सवय अनेकदा भाजपला भोवल्याचे पक्षनेते मान्य करतात. दिल्ली निवडणुकीआधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हनुमानाचे दर्शन घेतल्यावर तिवारी यांनी ज्या पद्धतीने त्यांची खिल्ली उडवली त्यामुळे मोठा वर्ग दुखावला गेला. 

मदनलाल खुराना, केदारनाथ सहानी, हर्षवर्धन आदी माजी अध्यक्षांचा वसा व वारसा तिवारी यांना सांभाळता आला नसल्याचा ठपका एका पक्षनेत्याने ठेवला.

कोण आहेत नवे अध्यक्ष ! 
दिल्लीचे नवे भाजप प्रदेशध्यक्ष आदेश कुमार गुप्ता यापूर्वी उत्तर दिल्लीचे महापौर होते. तिवारी यांच्याप्रमाणे ते दिल्ली भाजपमध्ये नवखे नाहीत. त्यांना अभाविपची पार्श्वभूमी आहे. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले आहे. नियुक्तीनंतरही त्यांनी, सर्व दिल्लीकर भाजप नेते-कार्यकर्ते यांचा सहयोग घेऊनच वाटचाल करू व दिल्लीत पुन्हा भाजपची सत्ता आणू असे सांगून आपली प्रकृती भिन्न असल्याचे दाखवून दिले.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख