#Ayodhya : आंदोलनातील चर्चित चेहरे आणि मोहरे 

राम मंदिर हा कोट्यवधी हिंदूच्या श्रद्धेचा मुद्दा. हाच मुद्या राजकीय करून अनेक नव्या-जुन्या राजकीय नेत्यांना या आंदोलनाने एक नवा चेहरा दिला. काही नेत्यांचा उदय झाला. काही आंदोलनात सहभागी झाले, तर काहींनी याला विरोधही केला. राम मंदिर आंदोलनाच्या जोरावर नंतर राजकारणात सत्तास्थानी जाण्याचा मार्ग अनेकांना मोकळा झाला.
#Ayodhya: Famous faces in ram mandhir movement
#Ayodhya: Famous faces in ram mandhir movement

पुणे : सुमारे चार दशके राम मंदिरासाठी आंदोलनं होत राहिली. या आंदोलनातून देशभर जनमत, समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. एका यात्रेनं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतल, ती म्हणजे लालकृष्ण अडवानी यांनी काढलेली रथयात्रा. "सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनायगें...' ही घोषणा देशभर आंदोलनावेळी दिली जात होती. या आंदोलनातून राजकीय पटलावर अनेक नेत्यांनी देशाचं लक्ष वेधून घेतलं.

राम मंदिर हा कोट्यवधी हिंदूच्या श्रद्धेचा मुद्दा. हाच मुद्या राजकीय करून अनेक नव्या-जुन्या राजकीय नेत्यांना या आंदोलनाने एक नवा चेहरा दिला. काही नव्या नेत्यांचा उदय झाला. काही आंदोलनात सहभागी झाले, तर काहींनी याला विरोधही केला. राम मंदिर आंदोलनाच्या जोरावर नंतर राजकारणात सत्तास्थानी जाण्याचा मार्ग अनेकांना मोकळा झाला. 

बाबरी मशिदीच्या बाजूने अनेक वर्ष संघर्ष करणारे हमीद अन्सारी, सैय्यद शहाबुद्दीन, तर मंदिराच्या बाजूने भूमिका मांडणारे राम मंदिर आंदोलनाला व्यापक स्वरूप देणारे महंत रामचंद्र परमहंस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख के. सी. सुदर्शन, विश्‍व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, देवराहा बाबा, महंत अवैद्यनाथ आता आपल्यात नाही. त्यांचे निधन झाले आहे. वादग्रस्त जागेचे कुलूप उघडणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी, बाबरी मशीद पाडली त्यावेळी असलेले पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचेही निधन झाले आहे.

आंदोलनाचे नायक ठरलेले लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह, उमा भारती आता सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. अडवानी यांची रथयात्रा बिहारमध्ये अडविणारे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोट्याळ्यात शिक्षा झाल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास थांबलेला आहे. 

लालकृष्ण अडवानी : राम मंदिर आंदोलनाला राजकारणाचा केंद्रीय मुद्दा बनविण्यात अडवानी यांचे योगदान मोठे आहे. विश्व हिंदू परिषदेतून सुरू झालेल्या या आंदोलनाला त्यांनी राजकीय आंदोलन बनविले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 1984 मध्ये भाजपचे दोनच खासदार निवडून आले होते. लालकृष्ण अडवानी यांची सन 1986 मध्ये भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून भाजपने हिंदुत्वाची कास धरली. पालमपूर येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात विश्व हिंदू परिषदेच्या राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला भाजपने पाठिंबा दिला. त्यावेळी झालेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपचे 85 खासदार निवडून आले होते. अडवानी यांनी 25 सप्टेंबर 1990 रोजी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली.

या आंदोलनामुळे भाजपची ताकद वाढली. या रथयात्रेचा दररोज 300 किलोमीटरचा प्रवास व्हायचा. यात अडवानींच्या दररोज किमान सहा सभा होत. या सभेच्या माध्यमातून देशभर राम मंदिराचा मुद्दा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तेव्हापासून अडवानींनी हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली. भाजपला सत्तेपर्यंत जाण्यास हा अजेंडा महत्वाचा ठरला. केंद्रात 1999 मध्ये भाजपची सत्ता आली अन अडवानी हे गृहमंत्री, उपपंतप्रधान बनले. लालकृष्ण अडवानी हे राम मंदीर आंदोलनाचे राजकीय नायक ठरले. बाबरी मशीद प्रकरणात अडवानी यांच्यावर खटला सुरू आहे. अडवानी सध्या सक्रीय राजकारणापासून अलिप्त आहेत. 

उमा भारती : कट्टर हिंदुत्ववादी म्हणून उमा भारती यांची ओळख या आंदोलनातून झाली. आपल्या प्रक्षोभक भाषणातून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा त्या 28 वर्षांच्या होत्या. जून 1990 मध्ये उमा भारती या विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शक मंडळाच्या सदस्या होत्या. राम मंदिर आंदोलनात महिला वर्गाला आकर्षित करण्यात (स्व.) राजमाता विजयाराजे शिंदे, उमा भारती व साध्वी ऋतुंभरा यांचे योगदान मोठे आहे.

भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत रामजन्मभूमी आंदोलनाबाबतचा प्रस्ताव उमा भारती यांनी आणला होता. त्यावेळी या मुद्यावर त्यांचे भाषण खूप गाजले होते. या आंदोलनामुळे भारती यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. "राम मंदिर माझ्या आस्थेचा विषय असून मला या आंदोलनात कारागृहात जावे लागले तरी मी जाईल', अशी घोषणा त्यांनी त्यावेळी केली होती. आपल्या प्रक्षोभक भाषणामुळे अनेक वाद त्यांनी ओढून घेतले होते. कट्टर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा झालेल्या उमा भारतींनी नंतर सक्रीय राजकारणात प्रवेश केला. नंतर त्या मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदीही विराजमान झाल्या. बाबरी मशीद प्रकरणी त्यांच्यावरही खटला सुरू आहे. वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्या केंद्रीय मंत्री होत्या. सध्या उमा भारती राजकारणापासून अलिप्त आहेत. 

राम मंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण उमा भारती यांना मिळाले आहे. त्यांनी ट्‌विट करून हा आनंद व्यक्त केला आहे. 

लालूप्रसाद यादव : अडवानी यांची रथयात्रा सोमनाथहून अयोध्येकडे निघाली होती. समस्तीपूर येथे बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी ही रथयात्रा अडवली अन्‌ अडवानींना अटक केली. तेव्हा केंद्रात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. या कारणामुळे व्ही. पी. सिंग यांच्या सरकराचा पाठिंबा भाजपने काढल्याने सरकार कोसळले. या सर्व घडामोडींचा फायदा लालूप्रसाद यादव यांना झाला. या घटनेत यादव हे मुस्लिमांचे तारणहार असल्याचे प्रतिमा बनली. मुस्लिम मते वळविण्यात लालूप्रसाद यशस्वी ठरले. अनेक वर्ष बिहारची सत्ता त्यांच्याकडे होती. लालूप्रसाद सध्या चारा गैरव्यवहारप्रकरणी कारागृहात आहेत. 

कल्याण सिंह : रामजन्मभूमी आंदोलनात उत्तर प्रदेशातील जबाबदारी कल्याण सिंह यांच्याकडे होती. आंदोलनाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी कारसेवेचे नेतृत्व केले. याचा त्यांना पुढच्या निवडणुकीत फायदा झाला. त्यांनी 1991 मध्ये निवडणुकीत सत्ता मिळविली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले. वादग्रस्त बाबरी मशीद पाडली, त्यावेळी कल्याण सिंह हेच उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी तेव्हा मुख्यमंत्री असलेले कल्याण सिंह यांची प्रतिमा हिंदुत्ववादी म्हणून समोर आली. बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यानंतर त्यांचे सरकार पडले. या आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात ते राज्यपाल होते. सध्या ते सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. 

मुलायम सिंह यादव : रथयात्रेच्या वेळी उत्तर प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव होते. अडवानींची रथयात्रा उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही, अशी घोषणा मुलायमसिंह यादव यांनी केली होती. या घोषणेमुळे यादव नावाची चर्चा त्यावेळी 
झाली होती. त्यांनी रथयात्रेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. पुढच्या निवडणुकीत यादव यांना याचा फटका बसला पण अल्पसंख्याकाचे हिरो म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. राज्याच्या राजकारणाच त्यांचे स्थान कायम राहिले. मुख्यमंत्री असताना त्यांनी 1990 मध्ये कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशात मजबूत झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सत्ता गमवावी लागली. 

राजीव गांधी : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आदेशानुसार 1986 मध्ये या वादग्रस्त जागेचे कुलूप उघडण्यात आले होते. या घटनेनंतर कॉंग्रेसची ताकद उत्तर प्रदेशात कमी झाली होती. अल्पसंख्याक विशेषतः मुस्लीम समाज कॉंग्रेसपासून दूर झाला. सन 1989 च्या निवडणुकीत कॉंग्रेसची सत्ता गेली, तर दोन वर्षांनंतर 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. 

पी. व्ही. नरसिंह राव : बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होते. या घटनेनंतर नरसिंह राव यांच्यावर त्याच्याच पक्षातील नेत्यांच्या टिकेला सामोरे जावे लागले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुस्लिम समाजाने गैरभाजप- गैरकॉंग्रेस सरकारचा पर्याय समोर आणून त्याचे समर्थन केले होते. कालांतराने पक्षातही नरसिंह राव यांचा दबदबा राहिला नाही. कॉंग्रेस आणि त्यांच्यात दरी निर्माण झाली. नरसिंह राव यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला पक्षाच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यास परवानगी दिली नव्हती. 

अशोक सिंघल : आंदोलनाला व्यापक स्वरूप देणारे अशोक सिंघल हे आंदोलनाचे प्रमुख हिरो होते. संघाने 1980 मध्ये त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी दिली. त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनावर लक्ष केंद्रीत केलं. विश्व हिंदू परिषदेचे ते आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. मुलामयसिंह यादव यांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेला छेदत त्यांनी गनिमी काव्याने अयोध्येत प्रवेश केला होता. या वेळी झालेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले होते. त्यांनी कारसेवकांचे नेतृत्व केले होते. शिलापूजन, दिल्ली येथील धर्मसंसद, हिंदू संमेलनातून त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाची धार तीव्र केली होती. बाबरी पाडल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. 

या शिवाय मुरली मनोहर जोशी, महंत अवैद्यनाथ, देवराहा बाबा, महंत रामचंद्रदास परमहंस, साध्वी ऋतंभरा, आचार्य गिरीराज किशोर, विष्णुहरी दालमिया, मोरोपंत पिंगळे, रामविलास वेदांती, महंत नृत्यगोपालदास, विनय कटियार हेही रामजन्मभूमी आंदोलनाचे महत्वाचे शिलेदार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com