जरा धीर धरा! सीरम इन्स्टिट्युटच्या अदर पूनावालांचे आवाहन... - Adar poonawalla to nations waiting for covidshield says please be patient | Politics Marathi News - Sarkarnama

जरा धीर धरा! सीरम इन्स्टिट्युटच्या अदर पूनावालांचे आवाहन...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

भारतासह जगभरात कोरोनाचा कहर अजून कमी झालेला नाही. 

पुणे : भारतासह जगभरात कोरोनाचा कहर अजून कमी झालेला नाही. भारतातील सीरम इन्स्टिट्युटकडून उत्पादित केल्या जात असलेल्या कोविशिल्ड लशीला जगभरातून मोठी मागणी आहे. पण भारतातील गरज भागविण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अन्य देशांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. 

 मागील काही दिवसांत भारतात महाराष्ट्र व केरळसह अन्य काही राज्यांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही शहरांसह अन्य राज्यातील काही शहरांमध्येही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरू असली तरी सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लशींचा वापर केला जात आहे. 

कोविशिल्ड ही लस अॉक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केली आहे. तर भारतात सीरमकडून त्याचे उत्पादन घेतले जात आहे. या लशीला भारतासह अन्य देशांमधूनही मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. पण भारताला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लस दिली जात असली तरी काही महिन्यांत सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यास सुरूवात केली जाणार आहे. तसेच खुल्या बाजारात लस उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र सरकारकडून काही महिन्यांत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने सीरमला भारताला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : पुणेकरांसाठी अलर्ट - असा वाढत गेला कोरोनाचा धोका...

पूनावाला यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ''सीरम इन्स्टिट्युटला देशाची गरज प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जगभरातील अन्य देशांच्या आवश्यकतेनुसार संतुलन ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. इतर देश व सरकारने धीर धरावा,'' असे आवाहन पूनावाला यांनी केले आहे. 

दरम्यान, भारतात सध्या महाराष्ट्र व केरळ राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत. जवळपास ७५ टक्के सक्रीय रुग्ण या दोन राज्यांतच आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख