स्वाक्षरी मोहिमेद्वारे राहुल गांधींना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी साकडे 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली स्वाक्षरी घेऊन या अभियानाची सुरवात केली जाणार आहे.
स्वाक्षरी मोहिमेद्वारे राहुल गांधींना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी साकडे 
Rahul Gandhi .jpg

पिंपरी : सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारला घालवून धर्मनिरपेक्ष काँग्रेस सरकार देशात आणण्यासाठी, खासदार राहुल गांधींनी तातडीने कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे. यासाठी कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यव्यापी 'महा स्वाक्षरी अभियान' पुढील आठवड्यापासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवडच्या कार्यकर्त्यांचा विशेष पुढाकार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली स्वाक्षरी घेऊन या अभियानाची सुरवात केली जाणार आहे. त्यासाठी पुढाकार घेतलेले प्रदेश कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाचे माजी अध्यक्ष अशोक मोरे यांनी शुक्रवारी (ता. १२ मार्च) 'सरकारनामा'ला सांगितले. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते हे हितचिंतक आणि नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतील.

पाच लाख सह्या गोळ्या करण्याचे लक्ष्य असून त्या मे महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सादर केल्या जाणार आहेत. त्यासाठी सह्यापुस्तके छापण्यात आली आहेत. श्रेष्ठींनी परवानगी दिली, तर इतर राज्यांतही ही मोहीम राबवण्याचा मानस मोरे यांनी बोलून दाखवला. त्यांच्याबरोबर अनिकेत कोठावळे, अशोक मंगल, आयुष मंगल, उमेश काळे, नरेंद्र बनसोडे, हिराचंद जाधव, सौरभ शिंदे हे या अभियानात सहभागी होणार आहेत.

यासंदर्भात मोरे म्हणाले, देशातील परिस्थिती बिघडली असून मोदी सरकारविरुद्ध असंतोष वाढत आहे. दुसरीकडे काँग्रेसचा जनाधार वाढत आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यांना तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना स्वीकारले जात आहे. त्यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे, याची खात्री पटू लागली आहे. पाच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

अशा वेळी राहुल गांधी यांनी समर्थपणे पक्षाची धुरा खांद्यावर घ्यावी आणि दमदारपणे देशाचेही नेतृत्व करावे, अशी आमची भूमिका आहे. कारण पक्षासह देशाला गतवैभव देण्यासाठी राहुल गांधी सक्षम आहेत. त्यांच्या प्रगल्भपणाबद्दल कोणालाही शंका नाही. ते आमची आशा आहेत. त्यांना पंतप्रधान बनवण्याची आमची महत्वाकांक्षा आहे. भाजपच्या विषारी प्रचारामुळे देश मानसिक दृष्ट्या दुभंगतो आहे. अशा वेळी देश वाचवण्यासाठी भाजपला सत्तेतून हटवून राहुल गांधींना पंतप्रधानपदी बसवणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.  

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in